पौड : गायी चरण्यासाठी शेतात गेलेल्या युवकाचा पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना जामगाव, ता.मुळशी इथे घडली आहे. दत्ता एकनाथ सुर्वे (वय अंदाजे ३५, रा.जामगाव, ता.मुळशी, जि. पुणे) असे युवकाचे नाव आहे. या घटनेची माहिती सरपंच विनोद सुर्वे यांनी दिली. दत्ता एकनाथ सुर्वे हा युवक काल दुपारी गायींना चरण्यासाठी शेताकडे गेला होता. रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने पौड पोलीस स्टेशन येथे रात्री उशिरा माहिती दिली असता त्याचा शोध घेण्यात आला. त्यावेळी टाटा कंपनीच्या खाणीतल्या पाण्याजवळ चप्पल, काठी व गमछा सापडला. याबाबत स्थानिक सरपंच विनोद सुर्वे यांनी तातडीने अमित कंधारे यांना कळवले. कंधारे यांनी तहसीलदार विजय कुमार चोबे यांच्याशी संपर्क साधला. तहसीलदार चोबे यांच्या मार्गदर्शनाखाली मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमोद बलकवडे, हनुमंत नवले व स्थानिक कार्यकर्ते यांनी शोध घेऊन एक तासात मृतदेह पाण्यातुन बाहेर काढून ग्रामीण रुग्णालय पौड येथे पाठवला. मात्र डॉ. राऊत यांनी युवकाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याप्रकरणाचा पुढील अधिक तपास पौड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संतोष दावलकर करत आहेत.