संतापजनक! ट्रॅफिकमध्ये अडकली ॲम्ब्युलन्स; मुळशी रोडवरच्या कोंडीने नागरिक संतप्त

प्रभात वृत्तसेवा
पौड – चांदणी चौक- मुळशी- ताम्हिणी महामार्ग हा मुळशी तालुक्याची लाईफलाइन मानला जातो. मात्र, भूगाव गावाजवळ सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असून स्थानिक नागरिकांसह प्रवाशांचे हाल होत आहेत.शनिवार आणि रविवार या दिवशी कोकणात जाणाऱ्या वाहनांची वाढलेली संख्या आणि पुलाचे सुरू असलेले काम यामुळे वाहतूक कोंडी अधिक तीव्र होते.
भुकुम- माताळवाडी ते भूगाव हा अवघा दहा मिनिटांचा रस्ता पार करण्यासाठी नागरिकांना तब्बल एक तास वाहतूक कोंडीत अडकून बसावे लागते. याच कोंडीत आज एक रुग्णवाहिका अडकून राहिल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त झाली. जीवितहानीची शक्यता उद्भवू शकणाऱ्या अशा परिस्थितीत अपुरा पोलीस बंदोबस्त आणि वाहतूक व्यवस्थापनाचा अभाव स्पष्टपणे जाणवत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
पुलाचे काम सुरू असताना वाहने वेगळी मार्ग रेषा किंवा तात्पुरता पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने कोंडी अधिक वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त वाढवणे, वाहतूक वळवण्यासाठी स्पष्ट सूचना फलक, तसेच पीक अवर्समध्ये ट्रॅफिक कंट्रोल वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
“भूगाव गावाजवळ पुलाचे काम सुरू असल्याने त्याठिकाणी ये- जा करण्यासाठी कमी जागा मिळत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. सद्यस्थितीत वाहतूक पोलिस तैनात असून ते वाहतूक सुरळीत करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत.”
-दत्ता चासकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक




