MSEDCL Fine: पुण्यात वीजचोरांना महावितरणचा मोठा दणका! १२८१ जणांना तब्बल ८१ लाखांचा दंड
MSEDCL Fine: महावितरणचे संचालक धनंजय औंढेकर यांच्या आदेशानंतर पुणे परिमंडलात मोठी कारवाई; १५ दिवसांत १२८१ वीजचोर रंगेहाथ पकडले.

MSEDCL Fine – वीजचोरीविरुद्ध महावितरणने पुणे परिमंडलात अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून, संपूर्ण परिमंडलात मागील १५ दिवसांत राबविलेल्या धडक मोहिमेत तब्बल १२८१ वीजचोरांना रंगेहाथ पकडले आहे. या वीजचोरांनी एकूण ३ लाख ४० हजार ७३० युनिट वीजचोरी केल्याचे उघड झाले असून, त्यांना ८१ लाख ५५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याने वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत.
महावितरणचे संचालक धनंजय औंढेकर यांनी नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीत वीजचोरांवर धडक मोहीम राबवून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी संपूर्ण परिमंडलात धडक मोहीम राबविली. भारतीय विद्युत अधिनियम २००३ मधील कलम १३५ व १३८ अन्वये मीटरमध्ये फेरफार करणे किंवा थेट आकडा टाकून वीजचोरी करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली, तर विजेचा गैरवापर करणाऱ्यांवर कलम १२६ अंतर्गत कारवाई झाली.
या मोहिमेत रास्तापेठ शहर मंडलात अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्या नेतृत्वाखाली ३७५ ठिकाणी वीजचोरी पकडून २३ लाख ३० हजार ८८० रुपये दंड वसूल केला. पुणे ग्रामीण मंडलात अधीक्षक अभियंता सुरेश सवाईराम यांनी ५८० वीजचोरांवर कारवाई करून २९ लाख ८२ हजार ६६० रुपये दंड ठोठावला. गणेशखिंड शहर मंडलात अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांच्या पथकाने ३२६ वीजचोरांना २८ लाख ४२ हजार १९० रुपयांचा दणका दिला.
अधिकृत वीजजोडणी घ्या
वीज ही राष्ट्रीय संपत्ती असून, त्याची चोरी करणे हा दंड आणि कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेला गंभीर गुन्हा आहे. अशा अनधिकृत कृत्यांमुळे जीवितहानीचा धोकाही संभवतो. त्यामुळे नागरिकांनी केवळ अधिकृत वीजजोडणी घेऊनच वीज वापरावी, असे आवाहन मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी केले आहे.




