MSEDCL Controversy: एका महिन्याचे बिल थकल्याने मीटर काढले! बिल भरताच संमतीविना बसवला डिजिटल मीटर
MSEDCL Controversy: नाणेकरवाडीतील दाभाडे यांचा महावितरणवर गंभीर आरोप; थकीत बिल भरूनही पूर्वसूचनेशिवाय डिजिटल मीटर बसवल्याने प्रश्न उपस्थित.

MSEDCL Controversy – नाणेकरवाडी येथील रहिवासी संगीता कुमार दाभाडे यांनी महावितरणच्या कर्मचार्यांविरोधात गंभीर आरोप केले आहेत. केवळ एक महिन्याचे वीज बिल थकल्यामुळे घरातील वीज मीटर काढून नेण्यात आले. त्यानंतर थकीत बिल तात्काळ भरल्यानंतर कोणतीही पूर्वसूचना किंवा ग्राहकाची संमती न घेता घरात डिजिटल वीज मीटर बसविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
संगीता दाभाडे यांच्या म्हणण्यानुसार, थकीत वीज बिल भरल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, काही वेळातच महावितरणचे कर्मचारी घरासमोर आले आणि कोणतीही माहिती न देता डिजिटल मीटर बसवून निघून गेले. मीटर बदलण्यामागील कारण किंवा त्यासंदर्भातील कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नसल्याचा त्यांचा दावा आहे. याबाबत संबंधित कर्मचार्यांकडे विचारणा केली असता, समाधानकारक उत्तर न देता ऑफिसमध्ये येऊन बोला असे सांगत अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
ग्राहकांशी उद्धट व असभ्य वर्तन केल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, वीज वितरण करणार्या शासकीय संस्थेच्या कर्मचार्यांनी ग्राहकांशी सन्मानपूर्वक व पारदर्शक पद्धतीने संवाद साधणे अपेक्षित आहे. मीटर बदलण्यासारख्या महत्त्वाच्या प्रक्रियेपूर्वी ग्राहकाला आवश्यक माहिती देणे गरजेचे असताना, तसे न करता थेट डिजिटल मीटर बसविण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकार्यांनी निष्पक्ष चौकशी करून संबंधित कर्मचार्यांच्या वर्तनाची दखल घ्यावी, तसेच मीटर बदलण्याची प्रक्रिया नियमानुसार झाली का, याची तपासणी करावी, अशी मागणी संगीता दाभाडे यांनी केली आहे. भविष्यात ग्राहकांना अशा प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी महावितरणने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या आरोपांबाबत महावितरणच्या संबंधित अधिकार्यांची अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.





