National Census – तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरात राष्ट्रीय जनगणना कामाने आता चांगलाच वेग घेतला आहे. या कामासाठी नियुक्त प्रगणक शिक्षक उन्हाच्या कडाक्यात घरोघरी (दारोदारी) जात असून राष्ट्रीय कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. मात्र जनगणनेचे काम करताना प्रगणक शिक्षकांना नागरीकांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचे पहावयास मिळत आहे. भर उन्हात दारात आलेल्या शिक्षकाला पाणी विचारणा केली जात नाही. दार देखील उघडलं जात नसल्याचे शिक्षकांनी सांगितले. तुम्ही कोण, कशाला आलात, कशासाठी माहिती पाहिजे, घर क्रमांक दारावर, दाराच्या चौकटीवर लिहू नका, भिंतीवर बाहेरील बाजूस लिहा, असे म्हणून नागरिक प्रगणक शिक्षकांची अवहेलना करत असून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचे शिक्षकांनी सांगितले. एकाबाजूला जनगणना काम करताना नागरीकांकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक आणि दुसऱ्याबाजूला घरोघरी जावून जनगणनेचे काम वेळेत पुर्ण करण्यासाठी तालुका प्रशासनाचा दबाव यामुळे प्रगणक शिक्षकांची अवस्था इकडे आड तिकडे विहिर झाली आहे. सध्या उन्हाळी सुट्टी तसेच घरगुती शुभकार्य असल्याने बरीच कुटुंब बाहेरगावी गेली आहेत. परिणामी प्रगणक शिक्षकांना बंद दाराचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागात काही ठिकाणी शहरांसारख्या गृहनिर्माण सोसायटीअंतर्गत उंच इमारती झाल्या आहेत. मात्र विकासकाने सुरुवातीला लिफ्टसारख्या दिलेल्या सोयी काही ठिकाणी बंद पडल्याने माहिती घेण्यासाठी शिक्षकांना दहाव्या मजल्यापर्यंत जिन्याने चढउतार करावे लागत असल्याने चांगलीच दमछाक होत असल्याचे सांगितले. १० प्रगणकांना कारणे दाखवा नोटीस जनगणना कामात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी १० शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस दिल्याचे निवासी नायब तहसिलदार डॉ. अरुण कदम यांनी सांगितले. यामध्ये प्रामुख्याने प्रगणक शिक्षकाने सुपरवायझरशी संवाद न साधने, वैद्यकीय कारण देत जनगणना काम न स्वीकारणे, जनगणना कामासाठी दोन ठिकाणी नियुक्ती, बदली शिक्षकांच्या जागेवर आलेल्या शिक्षकाने काम करण्यास नकार देणे, ऑनलाइन कामास दिरंगाई करणे, आदी कारणांचा समावेश असल्याचे सांगितले.