Kalas Load Shedding: नाही तर कार्यालयातच साप सोडणार! महावितरणच्या कारभारावर नागरिक का झाले आक्रमक?
Kalas Load Shedding: इंदापूरमधील कळस परिसरात रात्रीच्या भारनियमनामुळे जनजीवन विस्कळीत; दोन दिवसांत तो तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा.

Kalas Load Shedding – इंदापूर तालुक्यातील कळस परिसरात कृषी फिडरवरील घरगुती वीजग्राहकांना रात्रीच्या भारनियमनाचा मोठा फटका बसत असून, शेतकरी आणि ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत करण्यात येणार्या भारनियमनामुळे विद्यार्थी, महिला आणि शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. हे रात्रीचे भारनियमन तात्काळ रद्द करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
कळस परिसरातील अनेक वाड्या-वस्त्यांवरील घरगुती वीजजोडणी कृषी फिडरवर असल्याने नियोजित भारनियमनाचा फटका थेट नागरिकांना बसत आहे. सायंकाळच्या वेळेत वीज नसल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करता येत नाही, तर शेतातील कामे आटोपून घरी परतलेल्या महिलांना अंधारात स्वयंपाक करून जेवणाची व्यवस्था करावी लागत आहे. याशिवाय इमर्जन्सी लोडशेडिंग आणि पावसामुळे फॉल्ट या कारणांमुळे अनेकदा रात्रभर वीजपुरवठा खंडित राहत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
त्यामुळे चोर्यांची भीती वाढली असून, साप, विंचू यांसारख्या विषारी प्राण्यांचा धोका निर्माण झाला आहे. ग्रामस्थांनी महावितरणला इशारा देताना सांगितले की, कृषी फिडरवरील घरगुती ग्राहकांना तातडीने गावठाण फिडरवर जोडावे किंवा तोपर्यंत रात्रीचे भारनियमन पूर्णपणे बंद करावे. अन्यथा दोन दिवसांत शालेय विद्यार्थ्यांसह महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल. परिसरात पकडण्यात येणारे साप महावितरण कार्यालयात सोडण्याचाही इशारा काही नागरिकांनी दिला आहे.
कळस-विठ्ठलवाडीत दाम्पत्यास सर्पदंश
कळस येथील विठ्ठलवाडी परिसरात शुक्रवारी पहाटे उकाड्यामुळे घराबाहेर ओसरीत झोपलेल्या रामदास महादेव येडे आणि त्यांच्या पत्नी कुसुम येडे यांना विषारी सापाने दंश केला. दोघांनाही तातडीने इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रात्रीच्या वेळेस वीज नसल्यामुळे परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरते. त्यामुळे सापांसह इतर विषारी प्राण्यांचा धोका वाढत असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. अघोषित भारनियमनामुळे अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचा आरोपही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.


