MS Dhoni : धोनी आणि CSK; अटूट बंधन, आयपीएल निवृत्तीच्या चर्चांवर प्रेमाची मोहोर, VIDEO होतोय व्हायरल

MS Dhoni statement about retirement and IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) चा दिग्गज फलंदाज महेंद्र सिंग धोनीच्या आयपीएलमधून निवृत्ती घेण्याच्या चर्चांना नेहमीच उधाण येत असतं. मात्र, धोनीने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की, त्याचं सीएसके फ्रँचायझीशी असलेलं नातं खूप घट्ट आहे. आयपीएल 2026 च्या हंगामात खेळण्याबाबत त्यानी अद्याप कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही, परंतु नुकत्याच एका कार्यक्रमात त्यानी चाहत्यांना आश्वासित केलं की, तो खेळला किंवा न खेळला, तरी त्याचं मन नेहमीच सीएसकेसाठी धडकत राहील.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल –
‘धोनीशिवाय सीएसके नाही’ हे वाक्य चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेत असतं आणि धोनी स्वतःही ही भावना अधोरेखित करताना दिसतो. 44 वर्षीय धोनीने नुकतंच चेन्नईत आयोजित एका खासगी कार्यक्रमात भाषण केलं, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी तो म्हणाला, “मी नेहमीच सांगितलं आहे की, निर्णय घेण्यासाठी माझ्याकडे पुरेसा वेळ आहे. पण जर तुम्ही पिवळ्या जर्सीतील परतण्याबाबत विचारत असाल, तर मी म्हणेन की मी नेहमीच पिवळ्या जर्सीत राहीन, मग मी खेळेन की नाही हे वेगळं आहे. मी आणि सीएसके एकत्र आहोत. पुढील 15-20 वर्षंही असंच राहील.”
सीएसकेसोबत धोनीचा दृढ बंध –
I will always be sitting in Yellow Jersey – Thala 💛 #MSDhoni #WhistlePodu #CSK pic.twitter.com/k9Jlbtajc2
— WhistlePodu Army ® – CSK Fan Club (@CSKFansOfficial) August 6, 2025
2008 मध्ये आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून धोनी सीएसकेचा अविभाज्य भाग राहिला आहे. त्याने यंदा सीएसकेचं कर्णधारपद ऋतुराज गायकवाड यांच्याकडे सोपवलं असलं, तरी गायकवाड यांच्या दुखापतीमुळे धोनीने आयपीएल 2025 मध्ये काही काळ कर्णधारपद सांभाळलं. मात्र, पाच वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या सीएसकेसाठी मागील हंगाम फारसा चांगला राहिला नाही. संघाने 14 पैकी केवळ चार सामने जिंकले आणि गुणतक्त्यात तळाला राहिला, ज्यामुळे हा त्याच्या आयपीएल इतिहासातील सर्वात खराब हंगामांपैकी एक ठरला. तरीही, धोनीच्या उपस्थितीमुळे ड्रेसिंग रूममध्ये उत्साह कायम राहिला आणि चाहत्यांचाही संघाला जोरदार पाठिंबा मिळाला.
हेही वाचा – Ball Tampering : भारताच्या विजयाने शेजाऱ्यांना पोटशूळ, पाकच्या खेळाडूचा चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप
निवृत्तीच्या चर्चांना उधाण –
धोनीच्या आयपीएलमधून निवृत्तीच्या चर्चा गेल्या काही हंगामांपासून सुरू आहेत. अनेक क्रिकेट तज्ज्ञांचं मत होतं की, धोनी 2024 च्या हंगामानंतर आयपीएलला निरोप देईल. मात्र, गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतरही धोनीने मैदानावर पुनरागमन केलं आणि आयपीएल 2025 मध्ये पुन्हा पिवळ्या जर्सीत दिसला. आयपीएल 2026 मध्ये तो मैदानावर उतरणार की नाही, याबाबत त्यानी अधिकृतपणे काहीही सांगितलेलं नाही, परंतु त्यानी कर्णधार म्हणून ऋतुराज गायकवाडच्या पुनरागमनाला पाठिंबा दर्शवला आहे. धोनीचा सीएसकेसोबतचा प्रवास आणि चाहत्यांशी असलेलं त्याचं नातं यामुळे तो क्रिकेट विश्वातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व बनला आहे. त्याचं भविष्य काय असेल, हे पाहणं चाहत्यांसाठी उत्सुकतेचा विषय आहे.





