MPSC Result 2023: “आई आणि बापुशिवाय मी शुन्य”, उसतोड मजुराचा मुलगा बनला अधिकारी

बीड – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा नुकताच निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथील उसतोड मजुराचा मुलगा संतोष अजिनाथ खाडे याला मोठे यश मिळाले आहे. या परिक्षेत त्याची सोळावी रॅंक आली आहे. संतोषचं Dysp होण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. एका उसतोड कामगाराचा मुलगा अधिकारी बनणार असल्याने त्याच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
राष्ट्रावादीचे नेते धनंजय मुंडे यांनीही या संदर्भात एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. मुंडे यांनी पोस्टमध्ये म्हंटले आहे की, “जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबातील आमची भगिनी सोनाली मात्रे ही एमपीएससी मुख्य परीक्षेत महिलांमधून राज्यातून प्रथम आली तर संत भगवानबाबांच्या जन्मभूमी सावरगाव घाट येथील ऊसतोड कामगाराचा मुलगा संतोष अजिनाथ खाडे हा महाराष्ट्रातून सोळावा आला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यश संपादन केल्याचे दोघेही उत्कृष्ट उदाहरण आहेत. दोघांचेही मनापासून अभिनंदन. अधिकारी बनून राज्याची सेवा करताना आपण आपल्या मातीशी व मातीतील माणसांशी प्रामाणिक राहून सेवा कराल, ही अपेक्षा.”
दरम्यान, यश मिळविल्यानंतर संतोष अजिनाथ खाडे याने फेसबूक पोस्ट लिहीत आपलं हे यश आई वडीलांच्या कष्टाचं चीज असल्याचे म्हटले आहे. त्यांच्याशिवाय मी शुन्य आहे. आई आणि बापुचं उभं आयुष्य माझ्यासाठी कष्ट करण्यात गेलंय. तेव्हा मी कुठे इथपर्यंत पोहोचलोय. एका ऊसतोड कामगाराच्या मागे भक्कमपणे उभे राहीलेलं माझं सावरगाव घाट हे गाव या गावाला मी कधीच विसरू शकत नसल्याचे संतोष खाडे याने म्हटले आहे. दरम्यान, एका शेतमजुराचा मुलगा क्लास वन अधिकारी झाला असल्याने ग्रामस्थांसह तालुक्यात मोठा आनंद व्यक्त केला जात आहे.
( बातमी संपादन : ज्ञानेश्वर फड )





