MPSC Group C Main Exam – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ अंतर्गत विविध संवर्गांच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवारांची प्रवेशपत्रे आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. लिपिक-टंकलेखक, कर सहायक आणि बेलिफ लिपिक या पदांसाठी ही चाचणी घेतली जाणार आहे. मराठी टंकलेखन कौशल्य चाचणी २६ फेब्रुवारी २०२६ रोजी, तर इंग्रजी टंकलेखन चाचणी २७ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. परीक्षार्थींनी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्रे डाऊनलोड करून त्यांची मूळ प्रत सोबत आणणे आवश्यक आहे. त्याशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. उमेदवारांनी मुख्य परीक्षेचा अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापूर्वीचे म्हणजेच २५ ऑगस्ट २०२५ पूर्वी निर्गमित झालेले टंकलेखन प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. या प्रमाणपत्राची स्वसाक्षांकित प्रत प्रवेशावेळी जमा करावी लागेल, अन्यथा अंतिम शिफारशीसाठी उमेदवाराचा विचार केला जाणार नाही.