Pimpri : पॅट परीक्षेचा निकाल गुलदस्त्यात

पिंपरी : राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागामार्फत घेण्यात येणारी नियतकालीन मूल्यमापन चाचणी (पॅट) यंदाही ८ ते २५ एप्रिल या कालावधीत पार पडली. मात्र, मागील दोन वर्षांपासून या परीक्षांचा निकाल आणि फलनिष्पत्तीबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. ऐन उन्हाळ्यात विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून परीक्षा घेण्याचा हा प्रकार नेमका कशासाठी, असा सवाल उपस्थित होत आहे. यंदा तरी पॅट परीक्षेचा निकाल जाहीर होणार का, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
स्टार प्रकल्पांतर्गत इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, इंग्रजी आणि गणित विषयांच्या पायाभूत चाचण्या घेतल्या जातात. विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तींची पडताळणी करणे आणि त्यात सुधारणा घडवणे हा या परीक्षांचा मुख्य उद्देश आहे. यंदा ही चाचणी सरकारी, खासगी अनुदानित तसेच विनाअनुदानित शाळांमधील इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली. या परीक्षांसाठी प्रश्नपत्रिका राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) मार्फत शाळांना पुरवल्या जातात. शाळांमधून परीक्षा घेतल्यानंतर विद्यार्थ्यांचे गुण शिक्षण विभागाकडे पाठवले जातात.
मागील दोन वर्षांचा निकाल गुलदस्त्यात
पॅट परीक्षेचे हे तिसरे वर्ष आहे. यापूर्वी दोनदा या परीक्षा घेण्यात आल्या, परंतु त्याचा निकाल शिक्षण विभागाने जाहीर केलेली नाही. विद्यार्थ्यांच्या क्षमता वाढीसाठी कोणते उपाय योजले गेले, याबाबतही शिक्षण विभागाने मौन बाळगले आहे. परिणामी, या परीक्षांचा नेमका उपयोग काय, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.
शिक्षकांचा संताप
ऐन उन्हाळ्यात विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षकांना खटकला आहे. त्यातच, परीक्षा संपल्यानंतर अवघ्या पाच दिवसांत निकाल कसा तयार करायचा, असा प्रश्न शिक्षक उपस्थित करत आहेत. पॅट परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे मूल्यमापन होणे अपेक्षित आहे. मात्र, निकालाबाबत शिक्षण विभागाची उदासीनता शिक्षक आणि पालकांमध्ये नाराजीचे कारण ठरली आहे.





