MPSC Exam: एमपीएसससीचा मोठा निर्णय! आता पूर्वपरीक्षा कॉम्प्युटरवर; अवघ्या २१ दिवसांत रिझल्ट
MPSC Exam: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) आगामी सर्व पूर्व परीक्षा आता संगणकाधारित (CBT) पद्धतीने होणार; अध्यक्ष विवेक भीमनवार यांची महत्त्वपूर्ण घोषणा.

MPSC Exam – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) आगामी सर्व पूर्व परीक्षा आता कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (सीबीटी) म्हणजेच संगणकाधारित पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. या नव्या प्रणालीमुळे पूर्वपरीक्षांचे निकाल अवघ्या २१ दिवसांत जाहीर केले जातील आणि ज्या वर्षी परीक्षा होईल, त्याच वर्षात संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी घोषणा एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी केली आहे.
एमपीएसससी परीक्षांचे निकाल आणि पुढील टप्प्यांमधील विलंबामुळे उमेदवारांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी आयोगाने कालबद्ध नियोजनावर भर दिला आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा निकाल अवघ्या २२ दिवसांत लावण्यात आयोगाला यश आले असून, भविष्यात हा कालावधी २१ दिवसांवर आणला जाईल. नव्या धोरणानुसार मुलाखत असलेली पदे ९ ते ११ महिन्यांत, तर केवळ लेखी परीक्षा असलेली पदे ६ ते ७ महिन्यांत भरली जातील.
यामुळे विद्यार्थ्यांच्या करिअरमधील अनिश्चितता संपण्यास मदत होईल. दरम्यान, मुख्य परीक्षांच्या स्वरूपात कोणताही बदल नाही. हा महत्त्वपूर्ण बदल केवळ पूर्वपरीक्षांसाठीच लागू असेल. राज्यसेवा, गट ‘अ’, गट ‘ब’ किंवा गट ‘क’ च्या मुख्य परीक्षा पूर्वीप्रमाणेच पारंपरिक (ऑफलाइन) पद्धतीने घेतल्या जातील, त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असेही भीमनवार यांनी सांगितले.
सीबीटी आणि नॉर्मलायझेशन (गुण समानीकरण) ही पद्धत पूर्णपणे वैज्ञानिक आणि न्यायालयीन मान्यताप्राप्त आहे. आयोगाने आतापर्यंत १४० परीक्षा याद्वारे यशस्वीरीत्या घेतल्या आहेत. देशात याच पारदर्शक पद्धतीने लाखो विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेत असल्याचा दाखलाही भीमनवार यांनी दिला.


