MPSC Result – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) ढिसाळ आणि संथ कार्यपद्धतीचा फटका पुन्हा राज्यातील लाखो परीक्षार्थींना बसत आहे. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ होऊन तीन महिने झाले तरी अद्याप निकाल जाहीर झालेला नाही. आयोगाच्या या धोरणामुळे मुख्य परीक्षेच्या उंबरठ्यावर असलेल्या उमेदवारांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, यूपीएससीची परीक्षा पद्धत स्वीकारणाऱ्या आयोगाला त्यांची तत्परता का स्वीकारता येत नाही? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.९ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या पूर्व परीक्षेची दुसरी उत्तरतालिका २ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध झाली. मात्र, त्यानंतर महिना उलटूनही अंतिम निकालाबाबत आयोग मूग गिळून गप्प आहे. विशेष म्हणजे, राज्यसेवेची मुख्य परीक्षा २९ मार्च २०२६ पासून नियोजित आहे. निकाल जाहीर करण्यास होत असलेल्या विलंबामुळे उत्तीर्ण उमेदवारांच्या हाती सखोल अभ्यासासाठी केवळ ४० दिवसांचा कालावधी उरणार आहे. वर्णनात्मक स्वरूपाच्या मुख्य परीक्षेची तयारी इतक्या कमी वेळात करणे अशक्य असल्याचे सांगत, आयोग जाणीवपूर्वक उमेदवारांना स्पर्धेतून बाहेर ढकलत असल्याचा आरोप परीक्षार्थी करत आहेत. पुण्यासारख्या शहरात राहून मेस, खासगी रुमचा खर्च सोसणाऱ्या उमेदवारांवर आर्थिक-मानसिक तणाव वाढत असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षीही मुख्य परीक्षेसाठी वेळ मिळत नाही म्हणून आंदोलन करावे लागले होते, यंदाही तीच परिस्थिती ओढवली आहे,अशी संतप्त प्रतिक्रिया स्पर्धा परीक्षार्थी नितीन आंधळे यांनी दिली. आयोगाने तातडीने निकाल जाहीर करावा आणि या विलंबास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्याने केली. अन्यथा, हक्कासाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याचा इशारा परीक्षार्थी देत आहेत.