MPSC Exam 2025 : एमपीएससी परीक्षेला ‘पावसाचा ब्रेक’! २८ सप्टेंबरची परीक्षा आता होणार या तारखेला

प्रभात वृत्तसेवा
पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) यांच्यामार्फत संयुक्त पूर्व परीक्षा दोन दिवसांनी म्हणजेच दि. २८ सप्टेंबर रोजी होणार होती. मराठवाड्यासह अन्य भागांत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी उमेदवारांकडून होत होती. पुढील काही दिवसांत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अशा स्थितीत कोणताही उमेदवार परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी ही पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. त्यामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
एमपीएससीद्वारे महाराष्ट्र नागरी सेवा (राजपत्रित) संयुक्त पूर्वपरीक्षा येत्या रविवारी राज्यातील ३७ जिल्हाकेंद्रांवरील २४ उपकेंद्रांवर उपकेंद्रांवर घेण्यात येणार होती. तथापि, राज्यातील अनेक जिल्हाांमध्ये निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे अनेक जिल्ह्यांतील विविध गागांचा, तालुक्यांचा एकमेकांशी संपर्क तुटलेला आहे. याशिवाय राज्यातील हवामान खात्याने पुढील काही दिवसांत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे ही परीक्षा नियोजित तारखेस न घेता पुढे ढकलण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे. ही परीक्षा आता ९ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात येणार आहे.
संयुक्त पूर्व गट ब (अराजपत्रित) पूर्वपरीक्षा लांबणीवर..
आयोगामार्फत दि. ९ नोव्हेंबर रोजी संयुक्त पूर्व गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होती. आता मात्र त्याच दिवशी आयोगाने महाराष्ट्र नागरी सेवा (राजपत्रित) पूर्वपरीक्षेचे नियोजन केले आहे. त्यामुळे यापूर्वी दि. ९ नोव्हेंबर रोजी होणारी संयुक्त पूर्व गट ब (अराजपत्रित) परीक्षा रद्द केली असून, सुधारित तारखा स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.




