मोठी बातमी – नोव्हेंबरमधील MPSC परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय

मुंबई – राज्य सरकारचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) 11 ऑक्टोबरला होणारी परीक्षा पुढे ढकलल्याचा निर्णय ताजा असतानाच, आता महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा देखील रद्द करुन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नियोजित वेळापत्रकानुसार या परीक्षा अनुक्रमे दिनांक १ नोव्हेंबर २०२० आणि २२ नोव्हेंबर २०२० ला होणार होत्या. मात्र सरकारने आता या परीक्षा रद्द करून पुढे ढकलण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे.
तत्पूर्वी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 11 ऑक्टोबरला होणारी ‘एमपीएससी’ची परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात येत असल्याची शुक्रवारी घोषणा केली होती. ही परीक्षा कधी होणार आहे, याचा निर्णयही लवकरच घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.
हा निर्णय ताजा असतानाच आता आता महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा रद्द केली आहे.





