Paper Leak : MPSCच्या औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर कसा फुटला?; ‘इतक्या’ लाखांची डील, खळबळजनक माहिती समोर
Paper Leak : MPSC औषध निरीक्षक परीक्षा पेपर लीक प्रकरणात सहा आरोपी अटकेत. पार्किंगमध्ये प्रश्नपत्रिकेची देवाणघेवाण, 12 लाखांची कथित डील आणि 5 लाखांच्या व्यवहाराचा तपास सुरू.

Paper Leak : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपर लीक प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांचने मोठी कारवाई करत सहा आरोपींना अटक केली आहे. सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्यांना 2 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपासात पेपर लीकची साखळी MPSCच्या कार्यालयाच्या पार्किंगपासून सुरू झाल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणात MPSCशी संबंधित विश्वेश्वर नकाते (सहायक कक्ष अधिकारी), गोपाल मराठे (कक्ष अधिकारी) आणि अभिजीत लेंडवे (अवर सचिव) यांची नावे समोर आली आहेत. त्यांची नेमकी भूमिका तपासली जात आहे.
12 लाखांची कथित डील, 5 लाखांचा व्यवहार
तपासानुसार, परीक्षार्थी ऋतुजा पाटील हिने वडील अमृत पाटील यांच्याकडे पेपर मिळवून देण्याबाबत सांगितले. त्यानंतर अमृत पाटील कथित मध्यस्थ प्रवीण पाटीलच्या संपर्कात आला. मयूर ठाकरे याने दोघांची ओळख करून दिल्याचे तपासात समोर आले आहे. प्रवीण पाटील नंदुरबारमध्ये कोचिंग क्लास चालवतो.
प्रवीण पाटील आणि MPSCमधील अटक अधिकाऱ्यांमध्ये सुमारे 5 लाख रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. संपूर्ण डील सुमारे 12 लाख रुपयांमध्ये झाल्याचेही तपासात समोर आले असून, आर्थिक व्यवहाराचा तपास सुरू आहे. पुढील चौकशीत रक्कम वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा – मोठी बातमी! ब्रेकअपमुळं….; औषध निरीक्षक भरती परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाला आता नवं वळण
पार्किंगमधून बाहेर आला पेपर
MPSCच्या औषध निरीक्षक चाळणी परीक्षेच्या समन्वय अधिकाऱ्याची जबाबदारी असताना विश्वेश्वर नकाते याने तज्ज्ञांनी तयार केलेल्या 294 प्रश्नांचा संच चोरी केल्याचा आरोप आहे. 19 मार्च रोजी MPSCच्या कार्यालयाच्या पार्किंगमध्ये नकाते याने हा संच अभिजीत लेंडवे यांच्याकडे दिला. त्यानंतर लेंडवे यांनी त्याच पार्किंगमध्ये तो गोपाल मराठे यांच्याकडे सुपूर्द केल्याचे तपासात समोर आले.
20 मार्च रोजी गोपाल मराठे यांच्याकडून प्रवीण पाटीलने पार्किंगमध्येच प्रश्नपत्रिका स्वीकारली. या बदल्यात पाच लाख रुपये दिल्याची माहिती तपासात आहे.
यानंतर प्रश्नपत्रिका नाशिकमधील पाथर्डी फाटा येथील अमृत पाटील यांच्या निवासस्थानी नेण्यात आली. तेथे अमृत पाटील आणि त्यांची मुलगी ऋतुजा पाटील यांना ती देण्यात आली.
ब्रेकअपनंतर उघड झाला पेपर लीकचा प्रकार
ऋतुजाने पेपर आपल्याकडे आल्याची माहिती तिचा प्रियकर गौरव उर्फ लोकेश पाटील याला व्हॉट्सॲपवरून दिली. दोघांचे प्रेमसंबंध होते. मात्र निकालापूर्वी त्यांच्यात ब्रेकअप झाले. ऋतुजा पाटीलची गुणवत्ता यादीत सातव्या क्रमांकावर निवड झाली.
ब्रेकअपनंतर गौरवने पेपर लीकची माहिती MPSCला देण्याचा निर्णय घेतला. त्याने कंटेंट क्रिएटर ऋषिकेश गांगुर्डेशी संपर्क साधून त्याच्याकडे लीक झालेल्या पेपरची कॉपी असल्याचे सांगितले. त्यानंतर गौरवने MPSCला ईमेलद्वारे संपूर्ण प्रकार कळवला. मात्र काही दिवसांनी त्याने हा प्रकार आपण मस्करीत केल्याचे सांगितले.
या प्रकरणात गौरव पाटीललाही आरोपी करून अटक करण्यात आली आहे. ऋतुजा पाटीलला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
आता तपासाचा फोकस नेमका कुठे?
परीक्षेच्या दोन दिवस आधी प्रश्नपत्रिका आयोगातून बाहेर कशी पडली, ती कोणाकोणापर्यंत पोहोचली, 12 लाखांच्या कथित डीलमध्ये कोणाची भूमिका होती, पाच लाखांचा व्यवहार कोणामध्ये झाला आणि या नेटवर्कमध्ये आणखी किती जण सहभागी आहेत, याचा तपास क्राईम ब्रांचकडून सुरू आहे. अटक आरोपींच्या चौकशीतून पेपर लीकची संपूर्ण साखळी आणि इतर संभाव्य आरोपींची भूमिका स्पष्ट करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.





