MPSC Paper Leak : मोठी बातमी! ब्रेकअपमुळं….; औषध निरीक्षक भरती परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाला आता नवं वळण
MPSC Paper Leak : MPSC औषध निरीक्षक भरती पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण. ब्रेकअपनंतर तक्रार, MPSC अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक; तपासात नवे धागेदोरे समोर येण्याची शक्यता.

MPSC Paper Leak : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक (गट-ब) पदाच्या भरती परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. एका प्रेमसंबंधातील वाद आणि ब्रेकअपनंतर या कथित पेपरफुटीची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचल्याचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे. या प्रकरणामुळे MPSCच्या भरती प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उमेदवार ऋतुजा पाटील हिला शासकीय सेवेत रुजू करण्याच्या उद्देशाने तिचे वडील प्रवीण पाटील यांनी परीक्षेच्या दोन दिवस आधी पेपर मिळवला. यासाठी त्यांनी एका मध्यस्थाची मदत घेतल्याचा आरोप आहे. ऋतुजाने या पेपरचा अभ्यास केल्यानंतर तो तिचा मित्र गौरव यालाही दिला. त्यानंतर दोघांनी परीक्षा दिली. निकालात ऋतुजा उत्तीर्ण झाली, तर गौरव अनुत्तीर्ण झाला.
नापास झाल्यानंतर वाद, ब्रेकअप आणि थेट पोलिसांत तक्रार –
परीक्षेच्या निकालानंतर ऋतुजा आणि गौरव यांच्यात वाद सुरू झाले. पुढे या वादाचे रूपांतर ब्रेकअपमध्ये झाले. त्यानंतर गौरवने संतापाच्या भरात पोलिसांकडे धाव घेत ऋतुजा आणि तिच्या वडिलांविरोधात पेपरफुटीची तक्रार केल्याचे समोर आले आहे. या तक्रारीनंतर तपासाला वेग आला.
MPSCच्या अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक –
या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने MPSCच्या तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक केली आहे. MPSCचे अप्पर सचिव अभिजीत लेंडवे यांच्यासह सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे आणि विश्वेवर नकाते यांना अटक करण्यात आली आहे. तसेच परीक्षार्थी ऋतुजा पाटील, तिचे वडील अमृत पाटील आणि पेपरफुटीचा सूत्रधार म्हणून सांगितल्या जाणाऱ्या प्रवीण पाटील यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
पेपरफुटीची माहिती देणाऱ्या गौरव पाटीलची भूमिकाही तपासाच्या कक्षेत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. आरोपींच्या चौकशीतून पेपरफुटीच्या प्रकरणातील आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे.
488 उमेदवारांच्या मुलाखती, गुणवत्ता यादी जाहीर –
औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी 22 मार्च 2026 रोजी राज्यातील सहा विभागीय मुख्यालयांवर ऑफलाईन पद्धतीने चाळणी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल 12 जून रोजी जाहीर करण्यात आला. मुलाखतीसाठी 506 उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी 488 उमेदवारांच्या मुलाखती 1 ते 22 जुलैदरम्यान घेण्यात आल्या.
यानंतर 485 पात्र आणि तीन अपात्र अशा एकूण 488 उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. आता पेपरफुटी प्रकरणाच्या तपासातून या भरती प्रक्रियेतील आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.





