MPSC Chairperson: एमपीएससी अध्यक्षांच्या राजकीय पोस्टवरून काँग्रेस आक्रमक
MPSC Chairperson:

मुख्यमंत्री व अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी
MPSC Chairperson: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) अध्यक्ष विवेक भिमनवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर पाठीराखे असल्याचा पुरावा समोर आला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राजकीय म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा दावा त्यांच्याच अंगलट आला असून, नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्री फडणवीस व भिमनवार या दोघांनीही तातडीने राजीनामे द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली आहे.
आयएएस (आयएएस) अधिकाऱ्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष समर्थन न करणे आणि प्रशासकीय सेवेत तटस्थ राहणे हे नैतिक संकेत आहेत.
मात्र, आयएएस अधिकारी असलेल्या विवेक भिमनवार यांनी २०१४ मध्ये आपल्या ट्विटर अकाऊंटवरून देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र पोस्ट करीत त्यांची स्तुती व समर्थन केल्याचे उघड झाले आहे. यावरून भिमनवार यांची नियुक्ती राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
विद्यार्थ्यांच्या हक्कांच्या आंदोलनाला राजकीय रंग देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे समर्थकच घटनात्मक पदावर बसल्याने आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे तिवारी यांनी सांगितले.





