MPL : रत्नागिरी जेट्सची विजयी सुरुवात

पुणे – महाराष्ट्र क्रिकेट संघटने(एमसीए)च्या वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सामन्यात विजय पावले (3-33), कुणाल थोरात (2-16) यांनी केलेल्या सुरेख गोलंदाजीसह तुषार श्रीवास्तव (44 धावा) याने केलेल्या संयमी फलंदाजीच्या जोरावर रत्नागिरी जेट्स संघाने सोलापूर रॉयल्स संघाविरुद्ध 5 गडी राखून विजय मिळवत धडाकेबाज सुरुवात केली.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहूंजे येथील स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत रत्नागिरी जेट्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व तो त्यांच्या गोलंदाजांनी यशस्वी ठरविला. प्रथम फलंदाजी करताना सामन्यात सोलापूर संघ 3.3 षटकात बिनबाद 25अशी धावसंख्या असताना सलामीचा फलदांज यश नाहर (14 धावा) ला रत्नागिरीच्या डावखुरा फिरकीपटू कुणाल थोरातने यष्टिचीत केले.
त्यानंतर प्रविण दिशेट्टी (नाबाद 38) व ऋषभ राठोड (नाबाद 11) सोलापूर संघ 12.1 षटकात 3 बाद 82अशा स्थितीत असताना पाऊस सुरु झाला व त्यामुळे खेळ थांबविण्यात आला. त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज ऋषभ राठोडने 28चेंडूत 3चौकार 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 43 धावा, अथर्व काळेने 25 धावा काढून संघाला 145 धावांचे आव्हान उभे केले.
याच्या उत्तरात रत्नागिरी जेट्स संघाने हे आव्हान 17.2 षटकात 5बाद 147 धावा करुन हे आव्हान पुर्ण केले. यात तुषार श्रीवास्तवने 38चेंडूत 3चौकार व 2षटकाराच्या मदतीने 44 धावा, तर रोहीत पाटीलने 31चेंडूत 3चौकार व 2षटकाराच्या मदतीने 36 धावांची खेळी करत या दोघांनी पाचव्या गड्यासाठी 47 चेंडूत 62 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. हे दोघेही बाद झाल्यानंतर निखिल नाईकने नाबाद 19, दिव्यांग हिंगणेकरने नाबाद 2 धावा काढून संघाला विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी ठरला.
संक्षिप्त धावफलक
सोलापूर रॉयल्स : 20 षटकात 7 बाद 145 धावा (ऋषभ राठोड नाबाद 43, प्रवीण दिशेट्टी 39,अथर्व काळे 25, विजय पावले 3-33, कुणाल थोरात 2-16) पराभुत वि.
रत्नागिरी जेट्स : 17.2 षटकात 5 बाद 147 धावा (तुषार श्रीवास्तव 44, रोहीत पाटील 36, निखिल नाईक नाबाद 19, दिव्यांग हिंगणेकर नाबाद 2, यश बोरकर 1-10, ओमकार राजपूत 1-31, सत्यजीत बच्चाव 1-33); सामनावीर – कुणाल थोरात; रत्नागिरी जेट्स संघ 5 गडी राखून विजयी.





