MP Nitin Patil : “हिशोब द्यायला मी तयार, समोरासमोर या!” किसनवीर कारखान्याबाबत खा. नितीन पाटलांचे आव्हान
MP Nitin Patil : साखर तारणावर कर्ज मिळत नसल्याने विक्री करूनच पैसे द्यावे लागताहेत; ४६७ कोटींच्या विनियोगाबाबत नितीन पाटलांनी दिली माहिती.

MP Nitin Patil – मागील चार हंगामात किसनवीर व खंडाळा हे दोन्ही कारखाने व्यवस्थापनाकडून अतिशय काटकसरीने यशस्वीरित्या चालवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची, तोडणी वाहतूक, चालू व्यापारी देणी दिले आहेत. किसनवीर कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आमचे संचालक मंडळ प्रयत्नशील असून येत्या तीन-चार वर्षात किसनवीर व खंडाळा दोन्ही कारखाने सुस्थितीत आणणार असल्याची माहिती खा. नितीन पाटील यांनी दिली.
आंदोलकांनी समोर येऊन चर्चा करावी, हिशोब देण्यास कटिबद्ध, असल्याचेही त्यांनी सांगितले. किसनवीर कारखाना कार्यस्थळावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, संचालक संदीप चव्हाण, प्रकाश धुरगुडे, संजय कांबळे, किरण काळोखे, हनमंतराव चौवरे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, उपस्थित होते.
खा. नितीन पाटील म्हणाले, एनसीडीसी कडून मिळालेल्या रकमेतून पूर्वीच्या संचालक मंडळाची बँकांची, व्यापारी देणी, इतर देणी आत्तापर्यंत बँकांशी चर्चा करून तडजोडीने (एक रकमी परतफेड) करुन थकित देणी दिलेले आहेत. आजमितीस कारखान्याने नऊ बँका आणि पतसंस्थांची अशी मिळून सतरा कर्ज खाती मिटवली आहेत. आता फक्त दोन बँकांची असणारी देणी लवकरच देणार आहे.
कारखान्यास मिळालेल्या ४६७ कोटी रुपयांमधील सर्व रक्कम आपण त्याच कामासाठी वापरत आहोत. त्यातील एकही रुपया या कारखान्याच्या दैनंदिन कामासाठी वापरला नाही. बँकांच्या देण्या व्यतिरिक्त शासकीय देणी, जीएसटी, आयकर, कामगारांच्या भविष्या निर्वाण निधी चे पैसे देण्यात आमचे व्यवस्थापन यशस्वी झाले आहे. शासकीय देणी नियमित भरली जात आहेत.
याशिवाय एनसीडीसी च्या कर्जाची परतफेड सुद्धा सुरू आहे. सध्या कारखाना तोट्यात असून कारखान्यावर मालमत्तेपेक्षा अधिक कर्ज आहे. कारखान्याची आर्थिक स्थिती (नेटवर्थ मायनस) असल्याने इतर कोणत्याही बँका कर्ज देण्यास तयार नाहीत. त्यामुळे आपल्याकडे साखर साठा मोठ्या प्रमाणात शिल्लक असूनही आपल्याला साखर तारणावर कर्ज मिळत नाही. त्यामुळे साखर विक्री करूनच शेतकऱ्यांना उसाचे बिल द्यावे लागत असल्याचे खा. नितीन पाटील यांनी सांगितले.
प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तयार
किसनवीर कारखान्यावर आंदोलन करण्यासाठी जे कोणी येत असतील त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा मी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तयार असून त्यांनी कधीही माझ्याकडे यावे मी त्यांना सर्व हिशोब देईन अशी प्रतिक्रिया खा. नितीन पाटील यांनी दिली. उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी आभार मानले.






