Rahul Patil : उसाचे थकीत पैसे मागणाऱ्या शेतकऱ्यांना आमदार राहुल पाटलांकडून मारहाण? शेतकरी संघर्ष समितीचा आंदोलनाचा इशारा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे परभणीचे आमदार राहुल पाटील (Rahul Patil) यांच्यावर एका गंभीर प्रकरणावरून शेतकऱ्यांनी गंभीर आरोप केले आहेत.

Rahul Patil : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे परभणीचे आमदार राहुल पाटील (Rahul Patil) यांच्यावर एका गंभीर प्रकरणावरून शेतकऱ्यांनी गंभीर आरोप केले आहेत. चेअरमन असलेल्या लक्ष्मी नरसिंह साखर कारखान्याकडे मागील हंगामातील तुटलेल्या उसाचे हक्काचे १०० रुपये मागण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना आमदार राहुल पाटील यांनी दमदाटी करून मारहाण केल्याचा आरोप समोर आला आहे. या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून ऊस उत्पादक संघर्ष शेतकरी समिती आक्रमक झाली आहे.
नेमकं काय घडलं?
लक्ष्मी नरसिंह साखर कारखान्याने मागील वर्षी गाळप झालेल्या उसापोटी प्रतिटन अतिरिक्त १०० रुपये देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. आमरापूर परिसरातील काही शेतकरी या आश्वासनाची पूर्तता आणि पैशांची विचारणा करण्यासाठी कारखान्यावर गेले होते. शेतकऱ्यांचा आरोप आहे की, कारखान्याचे चेअरमन आणि आमदार राहुल पाटील (Rahul Patil) यांनी या चर्चेदरम्यान शेतकऱ्यांच्या अंगावर धावून जात त्यांना धमकावले व मारहाण केली.
शेतकरी संघर्ष समितीचा दोन हात करण्याचा इशारा
या घटनेनंतर ऊस उत्पादक संघर्ष शेतकरी समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. समितीच्या नेत्यांनी राहुल पाटील यांच्या या वर्तनाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.”राहुल पाटील हे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. हक्काचे पैसे मागणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर धावून जाणे कोणत्याही आमदाराला शोभत नाही. त्यांनी इथून पुढे अशी हिंमत करू नये.
कारखान्याकडे मागील वर्षाचे सव्वादोनशे रुपये अद्याप थकीत आहेत, तसेच यंदाच्या गाळपाचे पैसेही द्यावेच लागतील. ऊस आणि साखरेच्या बाजारभावाप्रमाणे अंतिम दर द्यावाच लागेल. लोकप्रतिनिधींनी जर शेतकऱ्यांवर अशी अरेरावी सुरू ठेवली, तर शेतकरीही रस्त्यावर उतरून दोन हात करतील आणि तीव्र आंदोलन छेडतील,” असा इशारा समितीने दिला आहे.
खासदार संजय जाधवांचा संताप: ‘शेतकऱ्यांशी बेईमानी करू नका’
या संपूर्ण प्रकरणावर खासदार संजय जाधव यांनीही अत्यंत कडक शब्दांत प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. “राहुल पाटील यांनी शेतकऱ्याला मारहाण करून हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी जर स्वतःच्या व्यथा आणि यातना घेऊन समोर येत असेल, तर त्याची अडचण समजून घेणे आणि त्याला मदत करणे हे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे.
तुम्ही पुढारी आहात, पुढाऱ्याने नेहमी सामंजस्याने आणि संवेदनशीलतेने वागले पाहिजे. शेतकऱ्यांकडे तुमचे स्वतःचे लेखी पत्र उपलब्ध आहे, ज्यात इतर कारखान्यांच्या बरोबरीने दर देण्याचे आश्वासन दिले होते. आज शेतकरी अडचणीत असताना निदान त्याच्याशी तरी अशी बेईमानी करू नका,” अशा शब्दांत जाधव यांनी पाटील (Rahul Patil) यांना सुनावले आहे.






