संगमनेर -संगमनेर शहरातील शिवसैनिकांनी बंडखोर खासदार सदाशिव लोखंडे यांच्या पोस्टरला काळे फासले. शहरातील शिवसेनेच्या कार्यालयावरील बॅनरवर बंडखोर खासदार लोखंडे यांचा फोटो होता. त्यावर शहरातील शिवसैनिकांनी काळे फासत निष्क्रीय खासदार दुसऱ्या गटात गेल्याने पेढे भरून, ढोल वाजविला. संगमनेरात लोखंडे आले तर त्यांना फटकविल्याशिवाय राहणार नाही, अशा कठोर शब्दांत शहर प्रमुख अमर कतारी यांनी निषेध केला.
एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. यात प्रामुख्याने शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि बंडखोर एकनाथ शिंदे गट यांच्यात काही दिवसांपासून रणकंदन माजले आहे. अशातच राज्यातील अनेक आमदारांनी शिवसेनेला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला. राज्यातील खासदारांसह शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केल्याने संगमनेर शहरातील शिवसैनिक आक्रमक होऊन शिवसेना शहर कार्यालयाच्या बॅनरवर असलेला लोखंडे यांच्या फोटोला काळे फसले. निष्क्रीय खासदार शिवसेनेतून शिंदे गटात गेल्याने पेढे भरवून आनंद ही साजरा करण्यात आला.
शिर्डी लोकसंख्या मतदार संघात खासदार लोखंडे यांना आम्ही दोन वेळा निवडून दिले. परंतु त्यांनी कधीही काम तर केले नाही. तसेच कुठेही फिरले सुद्धा नाही. त्यामुळे असे निष्क्रीय खासदार आम्हाला नकोच होते. ज्याप्रमाणे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी गद्दारी करून दुसऱ्या पक्षात गेल्याने संगमनेरात मारहाण केली होती. त्याप्रमाण लोखंडे ही संगमनेरात आले तर त्यांना बदडून काढल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड इशारा शहर प्रमुख अमर कतारी यांनी दिला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब हासे, पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते, कामगार सेना जिल्हाप्रमुख मुजीबभाई शेख, संपर्कप्रमुख नरेश माळवे , युवा सेना शहरप्रमुख अमोल डुकरे, उपशहर प्रमुख विकास डमाळे, इम्तियाज शेख, महिला आघाडीच्या संगीता गायकवाड, आशा केदारी, सुदर्शन ईटप, युवा सेनेचे अक्षय भाऊ बिल्लाडे, विद्यार्थी सेनेचे सचिन साळवे, अक्षय भाऊ गाडे, उपशहर प्रमुख वेणुगोपाल लाहोटी , दानिश खान, वैभव अभंग, विजू भागवत, शाखाप्रमुख आजीज मोमीन, रवि गिरी, राजाभाऊ सातपुते, फैसल सय्यद आदी उपस्थित होते.