Pune : खडकी टर्मिनसची अधिकाऱ्यांकडून पाहणी ! जमीन हस्तांतराचा प्रश्न मार्गी लावण्याची खासदार बापट यांची सूचना

पुणे, दि. 18 -खडकी येथे नवीन टर्मिनस सुविधा विकसित करण्यासाठी मुख्य प्लॅटफॉर्म आणि सध्याच्या मुख्य मार्गाच्या रुळाला लागून किमान दोन हजार मीटर लांब आणि 300 मीटर रूंद जमीन आवश्यक आहे. त्याबाबत लष्करी अधिकारी आणि रेल्वे प्रशासन यांनी बैठक घेऊन जमीन हस्तांतराचा प्रश्न लवकर मार्गी लावण्याची सूचना खासदार गिरीश बापट यांनी दिल्या.
खडकी टर्मिनसच्या कामाबाबत खासदार बापट यांच्यासह मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी व लष्कराच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी एकत्रित पाहणी केली. यावेळी पुणे विभागाच्या व्यवस्थापक रेणू शर्मा, डॉ. मिलिंद हिरवे व लष्करी अधिकारी उपस्थित होते.
शहरातील पुणे रेल्वे स्टेशनवरील ताण कमी करण्यासाठी खासदार बापट यांनी खडकी येथे नवीन रेल्वे टर्मिनस तयार करण्यास सुचविले होते. त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव व राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे याबाबत पत्रव्यवहार केला होता. गेल्या महिन्यात रेल्वे अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीतही त्यांनी टर्मिनस लवकर सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर लाहोटी यांनी मंगळवारी पाहणी केली.
खडकी यार्ड येथे पूर्वी लष्कराच्या वापरासाठी रेल्वे रूळ बांधण्यात आले होते. मात्र, 2021 पासून लष्कराने याचा वापर बंद केला होता. लष्कर वापरत नसलेले हे रेल्वे रूळ रेल्वेकडे हस्तांतरित करण्याची तयारी लष्कराने दर्शवली आहे. त्यानुसार याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. लष्कराच्या वापरासाठी पर्यायी व्यवस्थेसह जमिनीचा आणि या रेल्वे लाईन्सचा प्रश्न सोडवण्यासाठी अभियंता विभाग आणि लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याबद्दल चर्चा झाली.
हडपसर टर्मिनसची पाहणी
मध्य रेल्वेचे व्यवस्थापक अनिल कुमार लाटोही हे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी सोमवारी हडपसर टर्मिनसची पाहणी केली. या ठिकाणी भविष्यात गाड्या वाढविण्याच्या दृष्टीकोनातून स्टेबलिंग लाईन, प्रवाशांच्या दृष्टीकोनातून सुविधांच्या कामाचा आढावा घेतला. टर्मिनससमोरील रेल्वे क्वाटर्सच्या जागेची पाहणी त्यांनी केली. त्या ठिकाणी पार्किंग व इतर सुविधा करण्यात येणार आहेत. त्या कामाला सुरुवात करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.




