IND vs ENG : ‘पूरा खोल दिए पाशा…’, इंग्लंडला लोळवणाऱ्या सिराजचं असदुद्दीन ओवैसींनी हैदराबादी शैलीत केलं कौतुक
IND vs ENG Asaduddin Owaisi praises Mohammed Siraj : ओव्हल कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडवर ६ धावांनी रोमांचक विजय मिळवत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने अखेरच्या दिवशी चमत्कारिक कामगिरी करत इंग्लंडला नमवले. सिराजने सामन्यातील शेवटची विकेट घेत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. त्याच्या या खेळीने देशभरातील चाहत्यांसह हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनाही त्याचे चाहते बनवले.
चौथ्या दिवशी दिसत होती पराभवाची चिन्हे –
सामन्याच्या चौथ्या दिवशी भारत पराभवाच्या छायेत होता. इंग्लंडच्या हॅरी ब्रूक आणि जो रूट यांच्या शतकांमुळे त्यांनी ३७४ धावांच्या लक्ष्याच्या जवळ मजल मारली होती. मात्र, प्रसिधकृष्णा आणि मोहम्मद सिराज यांनी मिळून भारताचे सामन्यात कमबॅक केले. अखेरच्या दिवशी भारताला ४ विकेट्स आणि इंग्लंडला फक्त ३५ धावांची गरज होती. याचवेळी सिराजच्या तुफानी गोलंदाजीने इंग्लंडला गुडघे टेकायला भाग पाडले. सिराजने शेवटच्या ४ पैकी ३ विकेट्स घेत भारताला विजय मिळवून दिला.
ओवैसींकडून सिराजचे हैदराबादी शैलीत कौतुक –
Always a winner @mdsirajofficial! As we say in Hyderabadi, poora khol diye Pasha! pic.twitter.com/BJFqkBzIl7
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) August 4, 2025
सिराजने गस अॅटकिन्सनला बाद करत सामन्यासह डावात ५ विकेट्स पूर्ण केल्या. त्याच्या या शानदार प्रदर्शनाने देशभरातील चाहत्यांची मने जिंकली. हैदराबादचे एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही सिराजच्या कामगिरीचे हैदराबादी शैलीत कौतुक केले. त्यांनी आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट करताना लिहिले, “मोहम्मद सिराज, नेहमीच विनर! जसं आम्ही हैदराबादी म्हणतो, ‘पूरा खोल दिए पाशा’.”
मालिकेत सिराज ठरला सर्वोत्तम गोलंदाज –
सिराजने केवळ ओव्हल कसोटीतच नव्हे, तर संपूर्ण मालिकेत भारताचा सर्वोत्तम गोलंदाज म्हणून छाप पाडली. ९ डावांत त्याने सर्वाधिक २३ विकेट्स घेतल्या. यामध्ये दोनदा त्याने एका डावात ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. विशेष म्हणजे, ज्या दोन सामन्यांत त्याने ५-५ विकेट्स घेतल्या, त्या दोन्ही सामन्यांत भारताने विजय मिळवला. यापूर्वी एजबॅस्टन कसोटीतही सिराजने ५ विकेट्स घेत भारताला विजय मिळवून दिला होता.





