सत्ताधाऱ्यांचे आंदोलन; विरोधकांचा जल्लोष, कंत्राटी नोकरभरती आदेश रद्द प्रकरण

पुणे – राज्याचा प्रशासकीय कारभार हाकण्यासाठी शासनाने काढलेल्या कंत्राटी भरतीचा आदेश रद्द करण्यात आला आहे. या रद्द करण्यात आलेल्या आदेशाचे पडसाद पुण्यातही दिसून आले. हा आदेश भाजपने रद्द केला असला तरी हा निर्णय महाविकास आघाडीच्या काळात घेण्यात आला असल्याचे सांगत भाजपकडून शहरात आंदोलन करण्यात आले. तर, राज्यात वर्सभरापूर्वी सत्तेत आलेल्या महायुतीच्या सरकारला या आदेशावरून महाविकास आघाडीने जेरीस आणल्याने तसेच भाजप विरोधात जनक्षोभ वाढल्याने सरकारने हा निर्णय रद्द केला असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पेढे भरवून जल्लोष साजरा करण्यात आला.
भाजपचे आंदोलन
भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन गुडलक चौक येथे करण्यात आले. महाविकास आघाडीच्या काळात मोठ्या प्रमाणावर कंत्राटी कामगार भरती पद्धत अवलंबण्यात आली. महायुतीचे सरकार आल्यानंतर ही कंत्राटी पद्धत कशी चुकीची आहे, हे महाविकास आघाडीचे नेते सांगत आहे. ही पद्धत कोणी आणली हे महाविकास आघाडीला विचारले पाहिजे, अशी टीका करत आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, माजी मंत्री दिलीप कांबळे, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, राघवेंद्र मानकर, राहुल भंडारे, वर्षा तापकीर,महिला आघाडी अध्यक्ष हर्षदा फरांदे, युवा मोर्चा अध्यक्ष करण मिसाळ, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादीने वाटले पेढे
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने कंत्राटी भरतीच्या विरोधात सातत्याने आंदोलने केली व आवाज उठवला आणि एकूणच महाराष्ट्रातील सगळ्या बेरोजगार तरुण-तरुणींचा रोष लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने कंत्राटी भरती रद्द करण्याचा निर्णय घेतला. नव्हे त्यांना तो निर्णय मागे घ्यावा लागला हा एक प्रकारचा आमच्या सामूहिक प्रयत्नाचा विजय आहे, असे सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. आमदार रोहीत पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.





