Franz Beckenbauer : जर्मनीचे सर्वोत्तम फुटबॉलपटू फ्रान्झ बेकेनबाउर यांचे निधन झाले आहे. 78 व्यावर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फ्रान्झ बेकेनबाउरच्या कुटुंबाने जर्मन वृत्तसंस्था डीपीएला दिलेल्या निवेदनात त्यांनी ही माहिती दिली आहे. “आमचे वडील फ्रान्झ बेकेनबाउर यांचे काल (रविवार) निधन झाल्याचे जाहीर करताना आम्हाला अतिशय दुःख होत आहे,” असे निवेदनात सांगण्यात आले आहे. मात्र त्यांच्या मृत्यू मागचे कारण यात स्पष्ट करण्यात आलेले नाही.
‘डेर कॅसर’ टोपणनाव
जर्मनीचे मुख्य प्रशिक्षक ज्युलियन नागेल्समन यांना बेकेनबाउर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. “माझ्यासाठी बेकेनबाउर हा जर्मन इतिहासातील सर्वोत्तम फुटबॉलपटू होता. तो फुटबॉलपटू आणि नंतर प्रशिक्षक म्हणून उत्कृष्ट होता”, असे त्यांनी ज्युलियन नागेल्समन यांनी म्हंटले आहे. फ्रांझ बेकेनबॉअरला त्याच्या खेळण्याच्या शैलीमुळे आणि कर्णधारपदाच्या क्षमतेमुळे त्यांना ‘डेर कॅसर’ हे टोपणनाव देण्यात आले. जर्मन याचा अर्थ सम्राट किंवा राजा असा होतो. फुटबॉल विश्वात बेकेनबाउर ‘डेर कॅसर’ या टोपण नावाने लोकप्रिय होते.
फ्रान्झ बेकेनबाउर यांची कारकीर्द
फ्रान्झ बेकेनबाउर यांनी त्यांच्या कारकीर्दीत 1972 ते 74 दरम्यान बायर्नने देशांतर्गत स्पर्धेत विजेतेपदाची हॅटट्रिक साधली. त्यानंतर 1974 ते 1976 या कालावधीत तीन युरोपियन विजेतीपदेही बायर्नने मिळवली. वयाच्या 20 व्या वर्षी स्वीडनमध्ये विश्वचषक पात्रता फेरीत त्यांनी पश्चिम जर्मनीसाठी पदार्पण केले. या स्पर्धेतील त्यांच्या कामगिरीने जर्मनीने इंग्लंडमध्ये 1966 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत प्रवेश मिळवला.
1990 मध्ये त्यांनी जर्मनीला दुसऱ्यांदा विश्वविजेते केले. तेव्हा जर्मनीने अर्जेंटिनाचा पराभव केला. बेकेनबाउर यांनी कारकीर्दीत 70च्या दशकात बायर्न म्युनिककडून खेळताना युरोपियन अजिंक्यपदाची हॅटट्रिक नोंदवली. 1974 मध्ये संघाचे नेतृत्व करून पश्चिम जर्मनीला विश्वविजेते बनवण्यात फ्रान्झ बेकेनबाउरने महत्त्वपूर्ण योगदान दिले. 1990 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये अर्जेंटिनाविरुद्ध विजय मिळवणाऱ्या राष्ट्रीय संघाचेही त्यांनी कोचपद भूषवले. जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये त्यांची गणना होते.