Motilal Oswal Trophy (Snooker) : पिनाक, आनंद, सुरज, अभिजीत उपांत्य फेरीत…

पुणे :– डेक्कन जिमखाना क्लब तर्फे आयोजित ‘मोतीलाल ओसवाल करंडक’ डेक्कन जिमखाना अखिल भारतीय खुल्या स्नुकर स्पर्धेत पुण्याच्या पिनाक आनप, आनंद रघुवंशी, सुरज राठी आणि अभिजीत रानडे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. ज्युनिअर गटामध्ये आरव संचेती आणि आयान शेख यांच्यामध्ये विजेतेपदासाठी लढत होणार आहे.
डेक्कन जिमखाना क्लबच्या स्नुकर हॉलमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेच्या उपांत्यपुर्व फेरीत पुण्याच्या पिनाक आनप याने जेसन मल्होत्रा याचा ५९-४६, ०१-३८, ६०-४०, ४५-३५ असा पराभव करून अंतिम चार खेळाडूमध्ये आपले नाव निश्चित केले. आनंद रघुवंशी याने सचिन बिचे याची घोडदौड थांबताना त्याचा ४६-३५, ३७-३१, ६६-२० असा पराभव केला. चुरशीच्या झालेल्या सामन्यात अभिजीत रानडे याने महेश जगदाळे याचा २५-६०, ५०-०७, ६७-२३, १६-३०, ६७-१४ असा पराभव करून आगेकूच केले.
पुना क्लबच्या सुरज राठी याने १३ वर्षीय आरव संचेती याचे आव्हान संपुष्टात आणताना ३-२ असा विजय मिळवला. सुरज याने पहिली फ्रेम ६०-२४ अशी जिंकन छान सुरूवात केली. आरव याने सामना एकतर्फी होणार नाही याची काळजी घेताना दुसर्या फ्रेममध्ये ३६-२८ अशी बाजी मारताना १-१ अशी बरोबरी केली. तिसर्या फ्रेममध्ये सुरज याने आक्रमक खेळताना आरवला एकही गुण न देताना ९४-०० अशी फ्रेम जिंकत २-१ अशी आघाडी घेतली.
चौथ्या फ्रेममध्ये आरव यानेही अचूक खेळ करताना ४४ गुणांच्या फरकाने ५४-१० अशी फ्रेम जिंकून सामन्यात २-२ अशी बरोबरी केली. अंतिम आणि निर्णायक फ्रेममध्ये सुरज याने आरव याच्यापेक्षा सरस खेळ करताना ५९-११ अशा गुण फरकाने सामना जिंकून उपांत्य फेरी गाठली.
Motilal Oswal Trophy (Snooker) : आरव संचेतीसह सचिन बिचे, जेसन मल्होत्रा उपांत्यपूर्व फेरीत….
ज्युनिअर गटाच्या उपांत्य फेरीत आरव संचेती याने आपले खुल्या गटातील अपयश धुवून टाकताना अथर्व साठे याचा ५४-१४, ३२-२७, ४४-१२ असा सरळ फ्रेममध्ये पराभव करून अंतिम फेरी गाठली. आयान खान याने ओवेस शेख याचा ५७-१०, २०-२४, ३४-२०, ५५-१६ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.





