mother daughter drowned: काळजाचा थरकाप! कपडे धुताना असं काही घडलं; मणेराजुरीत मायलेकीचा तलावात बुडून अंत
mother daughter drowned: खटाव तालुक्यातील मायलेकीचा सांगली जिल्ह्यात तलावात बुडून मृत्यू; दुर्घटनेनंतर पुसेसावळी परिसरावर शोककळा.

mother daughter drowned – मजुरीसाठी सांगली जिल्ह्यातील मणेराजुरी (ता. तासगाव) येथे गेलेल्या सत्वला संतोष जाधव (वय 28) आणि मंजू संतोष जाधव (वय 10, रा. पुसेसावळी, ता. खटाव) या मायलेकीचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे पुसेसावळी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, पुसेसावळी येथील संतोष जाधव यांचे कुटुंब दरवर्षी पावसाळी हंगामात मोलमजुरीसाठी मणेराजुरी (ता. तासगाव) परिसरात जात होते.
त्यानुसार महिनाभरापूर्वीच ते पत्नी सत्वला, मुली मंजू, अंजू आणि मुले अविनाश (वय 9) व रोहित (वय 5) यांच्यासह मणेराजुरी येथे गेले होते. सत्वला जाधव या आपल्या चार मुलांसह बुधवारी (दि. 10( दुपारी चिमणखोरा पाझर तलावावर कपडे धुवायला गेल्या होत्या. सत्वला या कपडे धुण्यात व्यग्र असताना, त्यांची मुलगी मंजू तलावात आंघोळीसाठी उतरली. पाण्याचा अंदाज न आल्याने ती खोल पाण्यात बुडू लागली.
तिला वाचवण्यासाठी सत्वला यांनी तलावात उडी मारली. दुर्दैवाने या दोघी खोल पाण्यात बुडाल्या. किनार्यावर असलेल्या अंजूने हा प्रकार पाहून आरडाओरडा केला. तिने तत्परता दाखवून मोबाइलवरून वडिलांशी संपर्क साधला. संतोष जाधव व स्थानिक नागरिक घटनास्थळी धावले. तोपर्यंत दोघींचाही बुडून मृत्यू झाला होता.
या घटनेची माहिती मिळताच तासगावचे पोलीस निरीक्षक विशाल टकले व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. आई आणि बहीण यांचे मृतदेह पाहून, अविनाश आणि रोहित या लहानग्यांनी टाहो फोडला. ते पाहून घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते.





