दखल : पालकत्वाचा विकृत चेहरा

– योगिता अडसरे
सांगलीतील घटनेनं संपूर्ण समाजाच्या अंतर्मनाला हादरवून टाकलं आहे. शिक्षणामध्ये यश मिळवण्यासाठी मुलांना शिस्त लावणं गरजेचं आहे, हे खरेच; पण ही शिस्त जर अमानुष मारहाणीच्या स्वरूपात असेल, तर ती विकृती ठरते.
पालक व मुले यांच्यात परीक्षेतील गुणांबाबत होणारा संघर्ष वाढत चालला आहे. हल्ली पालक मुलांना जन्माला येण्याच्या आधी जसे नाव काय ठेवायचे अगदी त्याचप्रमाणे स्कूल ठरवून ठेवतात. मग ते स्कूल इंटरनॅशनल बोर्डचे असेल, सीबीएसई बोर्ड किंवा महाराष्ट्र बोर्ड असेल, त्याची फी किती आहे? हे सर्वच ठरवून ठेवतात. पण आपण जन्म दिलेल्या मुलाच्या क्षमता किती आहे हे पालकांना माहीत नसते.
पालक आपल्या इच्छेनुसार, आपल्या स्वप्नांनुसार शाळा निवडतात आणि तो अपेक्षांचा बोजा मुलांच्या डोक्यावर ठेवतात. मग हे इंटरनॅशनल बोर्ड, सीबीएसई बोर्ड, महाराष्ट्र बोर्ड इत्यादी आपल्या मुलाला किती पेलवणार आहे याचा विचार मात्र पालकांच्या मनात येत नाही. मग ते शारीरिक असो की मानसिक ही समस्या वेल एज्युकेटेड पालकांमध्येच अधिक प्रमाणात दिसून येते.
सर्वसामान्य शिक्षण असलेल्या पालकांमध्ये मुलांना छळण्याचे प्रमाण कमी असते. मी एवढा शिकलेलो आहे मग माझ्या मुलांनी छान अभ्यास करावा, आउट ऑफ मार्क्स पाडावे हे एज्युकेटेड पालकांचे स्वप्न असते. कमी मार्क्स पडले किंवा एक मार्क्स जरी कमी पडला तरी मुलांना बेदम मारहाण करणारे पालक आपण समाजामध्ये पाहतो.
पण पालक मात्र विचार करत नाही आपण ज्यावेळी लहान होतो त्यावेळी आपल्याला किती मार्क्स मिळत होते, आपल्याला किती टक्के मिळत होते. हे जरा प्रत्येक पालकांनी थोडेसे मागे जाऊन पहावे आणि आत्मपरीक्षण करावे. जरी काही पालकांना आउट ऑफ मार्क्स मिळत होते तरी त्यांनी आपल्या मुलांच्या क्षमतांचा अभ्यास करावा व तशा अपेक्षा ठेवाव्यात.
बरेच पालक आपल्या मुलांना सतत असं म्हणतात की, आम्हाला आमच्या पालकांनी चांगल्या शाळेत घातले नाही, आम्हाला ट्युशन लावले नाही, आम्हाला त्यांनी स्वतः शिकवलं नाही, अभ्यास घेतला नाही इत्यादी त्यामुळे आमची जास्त प्रगती झाली नाही. नाहीतर आज आम्ही कुठेच्या कुठे असतो. परंतु आम्ही तुम्हाला सगळ्या सोयीसुविधा देतोय व तुम्हाला अभ्यास करायला, मार्क्स पाडायला काय हरकत आहे.
जर चांगले मार्क्स नाही पडले तर त्या मुलांची काय अवस्था होते हे त्या मुलांना आणि पालकांना माहीत असते. पालक यासाठी मुलांना शाळेतून आले की, खासगी शिकवणीला पाठवतात, नंतर शाळेचा होमवर्क असे मुलांना पूर्णवेळ अभ्यासातच व्यस्त ठेवतात. कारण प्रत्येक पालकाला आपल्या मुलाला डॉक्टर व इंजिनिअरच बनवायचे आहे. त्या अनुषंगाने चाललेली ही केविलवाणी धडपड असते.
पालकांनी ध्येय उच्च ठेवण्यास काहीच हरकत नाही; परंतु मुलांच्या क्षमतांचा निश्चितच विचार होणे आवश्यक आहे. यासाठी मुलांच्या क्षमतांचे मापन करणार्या मानसशास्त्रीय चाचण्या आहेत. अगदी 3 वर्षे वयापासून ते प्रौढ व्यक्तीसाठी देखील असतात. तुम्ही या बुद्धिमापन चाचण्या समुपदेशकाकडून किंवा मानसशास्त्रज्ञाकडून करून घेऊ शकता.
तसेच पालक हे शाळा, ट्यूशन आणि इतर खर्च मिळून हजारो व लाखो रुपये भरून मुलांना जर मार्क्स कमी पडत असतील तर त्याचा सर्व दोष हा शाळा व त्या मुलाला देतात; परंतु पालकांनी आपल्या मुलाच्या क्षमता किती आहेत याचा अभ्यास करून त्यानुसार त्याला शिक्षण द्यावे.
आज मुलांचे डिप्रेशनमध्ये जाण्याचे प्रमाण व आत्महत्या करण्याचे प्रमाण का वाढत आहे? याचाही पालकांनी विचार करावा. हे एक दिवसाचे कारण नसते किंवा एक दिवसाचा ताणतणाव नसतो, तर त्यामागे बर्याच दिवसांचा, महिन्यांचा ताणतणाव हा मुलांमध्ये असतो. त्यासाठी वेगवेगळी कारणे जबाबदार असतात.
प्रत्येकवेळी अभ्यास व मार्क्स हेच कारण असेल असेही नाही, तर मुलांना शिक्षा करण्यात इतरही कारणे जबाबदार आहेत. अंगावर काटा येणार्या बातम्या आपण पाहतो व ऐकतो. आजच्या काळात शिक्षणाच्या नावाखाली किंवा मार्क्सच्या दडपणातून पालक जेव्हा आपल्या मुलांना शारीरिक व मानसिक त्रास देतात, तेव्हा ते केवळ अनुचितच नाही, तर एकप्रकारे बालहक्कांचे उल्लंघन आणि मानसिक अत्याचारदेखील आहे.
शिक्षेचा विकृत दबाव?
अनेक वेळा पालक मुलांच्या कमी मार्क्सच्या भीतीतून किंवा इतर मुलांशी तुलना करताना अपेक्षा करतात. परिणामी, त्यांचं वर्तन शारीरिक शिक्षा आणि मानसिक छळ याकडे वळतं. काही उदाहरणांमध्ये तर मुलांच्या शरीरावर जखमा, मारहाण इत्यादी प्रकार समोर आले आहेत, जे कोणत्याही दृष्टीने स्वीकारार्ह नाहीत.
या समस्या मागील प्रमुख कारणे
1) शिक्षण आणि मार्क्सवर अति लक्ष केंद्रित करणे व त्यास अनावश्यक महत्त्व देणे. 2) समाजातील तुलना, स्पर्धा आणि प्रतिष्ठेचं दडपण व अनावश्यक नको तो खर्च करून मोठमोठ्या फी असलेल्या शाळेत मुलांना घालणे व त्याबदल्यात मार्क्सची अपेक्षा ठेवणे. 3) पालकांचं स्वतःचं अपूर्ण बालपण किंवा दबलेली भावनिक अस्थिरता व अपूर्ण राहिलेली स्वप्न व अवास्तव अपेक्षा ही कारणे प्रामुख्याने नजरेस येतात. 4) अत्यंत महत्त्वाचे कारण म्हणजे खासगी शाळांच्या भरमसाठ व आवाक्याबाहेर वाढलेल्या फी यामुळेदेखील पालकांचा ताणतणाव वाढत आहे व पर्यायाने मुलांवर त्याचा सर्व राग काढला जात आहे. कारण पालकांच्या मनात फी व मार्क्स हे समीकरण पक्के घर करून बसले आहे. म्हणजेच ‘कमी फी कमी अपेक्षा’ व ‘जास्त फी जास्त अपेक्षा’ ठेवल्या जातात.
उपाययोजना काय?
1) पालकांसाठी शाळा व महाविद्यालयांनी भावनिक शिक्षण आणि मार्गदर्शन सत्रं घेणं आवश्यक आहे. 2) पालकत्वाच्या सकारात्मक पद्धती (झेीळींर्ळींश झरीशपींळपस) शिकवणे महत्त्वाचे आहे. 3) मुलांवर होणार्या शारीरिक/मानसिक त्रासाची तक्रार नोंदवण्यासाठी यंत्रणा बळकट करणे. 4) शाळांप्रमाणेच घरीही शिक्षा विरहित, संवादाधिष्ठित संस्कारांचं वातावरण तयार करणे अपेक्षित आहे. 5) मुलांसाठी समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देणं व मुलांच्या क्षमतांचे/बुद्धिमत्तेचे मापन करून घेणे. 6) अतिअपेक्षा ठेवणे टाळावे.
मुलांचा हक्क काय सांगतो?
यूएनसीआरसी म्हणजे संयुक्त राष्ट्र बालहक्क करारानुसार प्रत्येक मुलाला संरक्षण, आदर, शिकण्याचं स्वातंत्र्य आणि भावनिक सुरक्षितता मिळणं हे मूलभूत हक्क आहेत. आपल्या मुलांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी त्यांना आनंदी ठेवावे, त्यांच्यामधील शारीरिक व मानसिक बदलांचा अभ्यास करून मार्गदर्शन करावे, तणावमुक्त वातावरण ठेवावे, त्यांच्या कला कौशल्यांना वाव द्यावा, व्यायाम शिकवावा, प्राणायाम व ध्यान करून घ्यावे व स्वतःही करावे. त्यामुळे स्वतः पालक व मुले आनंदी आयुष्य जगतील. म्हणूनच आज पालकत्वाला हवी आहे पुनर्विचाराची गरज.





