Sangli gangwar : सांगलीतील कारागृहात दोन टोळ्यांमध्ये जोरदार राडा झाला असल्याची बातमी समोर आली आहे. दोन सराईत गुन्हेगारांना १६ जणांच्या टोळीने बेदम मारहाण केली. यावेळी विटांनी केलेल्या मारहाणीत दोघे जखमी झाले आहेत. कारागृहातील खुल्या मैदानात हा प्रकार घडल्याने एकाच गोंधळ उडाला होता. दरम्यान कारागृहातील कैद्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जखमी गुंड पवन साळुंखे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जिल्हाधिका-यांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई करून एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. तर त्याचा साथीदार मेघशाम ऊर्फ मोठ्या जाधव हा देखील सराईत गुन्हेगार आहे. त्यामुळे दोघांना वेगळ्या बरॅकमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान, या दोघांचे कट्टर विरोधक असणारा आदित्य पवार याच्यासह १६ जण वेगवेगळ्या गुन्ह्यांत सांगली कारागृहात वेगळ्या बरॅकमध्ये आहेत. या दोन्ही टोळींना कारागृहातील खुल्या मैदानात आणण्यात आले होते. यावेळी ते समोरासमोर आले. १६ जणांच्या टोळीने गुंड पवन साळुंखे आणि मेघ:श्याम ऊर्फ मोठ्या जाधव या दोघांना तुम्हाला वेगळ्या बरॅकमध्ये ठेवले आहे. म्हणून स्वत:ला शहाणे समजता का? असे म्हटले. त्यामुळे दोन्ही टोळींत खटका उडाला. दोन्ही टोळींत जोरदार वादावादीचा प्रकार घडला. त्यानंतर गुन्हेगार आदित्य पवारने या दोघांना मारा असे त्याच्या टोळीला सांगितले. यानंतर या दोघांनी पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र १६ जणांनी त्यांचा पाठलाग करून विटांनी बेदम मारहाण केली. यामध्ये दोघे जखमी झाले आहेत. या घटनेमुळे मात्र सांगली कारागृहात एकच गोंधळ उडाला होता. याबाबत सांगली शहर पोलिस अधिकचा तपास करीत आहेत.