पुणे : मरणानेही नाही सुटका, रेल्वे ट्रॅकवरील बहुतांश मृतांची पटत नाही ओळख

पुणे (संजय कडू) – जगण्याने छळले होते… मरणाने केली सुटका… अशी भावना तयार झाल्याने रेल्वेखाली आत्महत्या करणाऱ्यांची अवस्था मरणानेही नाही सुटका अशी होत आहे. आत्महत्या करणाऱ्यांपैकी सुमारे 30 टक्के नागरिकांची ओळखच पटत नसल्याचे भीषण वास्तव समोर येत आहे. त्यामुळे ट्रॅकवर मरण पावलेल्यांची ओळख पटवण्याचे आव्हान रेल्वे पोलिसांपुडे उभे राहिले आहे.
पुणे विभाग रेल्वे ट्रॅकवरील मृत्यूंचे प्रमाण अस्वस्थ करणारे आहे. रेल्वेसेवा सुरळीत असताना 2019 मध्ये 519 जणांचा मृत्यू झाला. 340 नागरिक जखमी झाले. यात मरण पावलेल्या 191 नागरिकांची अद्याप ओळख पटली नाही. अपघात, आत्महत्या, रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना गाडीचा धक्का लागणे किंवा दरवाजात उभे राहून प्रवास करताना तोल जाणे अशी या अपघाताची कारणे आहेत.
ओळख पटवणे हे मुख्य आव्हान
रेल्वे ट्रॅकवर अपघातात मृत्यू पावणाऱ्यांची ओळख पटवणे हे एक मोठे आव्हान असते. रेल्वेखाली सापडेल्या व्यक्तींचे शरीर अनेकदा छीन्न विच्छीन्न झालेले असते. आमच्या कर्मचाऱ्यांना हे शरीर तुकड्या तुकड्यात उचलावे लागते. अशा शरीराचे शवविच्छेदनही करता येत नाही. दिवसभरात एकाच ट्रॅकवरून अनेक गाड्या गेलेल्या असतात.
एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या गाड्यांचे प्रमाण मोठे आहे. यामुळे प्रवासी नक्की कोणत्या गाडीतून पडला आहे हे शोधणेही कठीण असते. लांब पल्ल्याच्या गाड्यातून प्रवास करताना अनेकदा प्रवासी टी शर्ट आणी ट्रॅकपॅंटवर असतात. त्यांच्या खिशात ओळखपत्र, पाकिट असे काहीही नसते. अनेकदा कंटाळा आल्यावर प्रवासी दारात उभे राहून प्रवास करतात. तर कधीकधी पुढचे स्टेशन कोणते आले हे पाहण्यासाठीही दारापाशी येतात. अशावेळी तोल जाऊन ट्रॅकवर पडून मृत्यू होण्याचे प्रकारही घडतात. मृतदेह मिळाल्यावर जसे ओळख पटवणे महत्त्वाचे असते तसेच हा अपघाती मृत्यू आहे का? घातपात आहे का? की आत्महत्या आहे? हे शोधावे लागते. यामुळे आमचा तपास खूनाच्या शक्यतेपासून ते आत्महत्येच्या शक्यतेपर्यंत सर्व अंगाने सुरू असतो, असे अपर पोलीस अधिक्षक(रेल्वे) कविता नेरकर-पवार यांनी सांगितले.
लॉकडाऊनमुळे मागील दोन वर्षांत अनेक महिने रेल्वेसेवा बंद होती. रेल्वेसेवा सुरू झाल्यावर तीही तुरळक प्रमाणात होती. यामुळे रेल्वे ट्रॅकवरील मृत्यूंचे प्रमाण जवळपास निम्म्यानी घटले आहे.
– कविता नेरकर-पवार,
अपर पोलीस अधिक्षक, रेल्वे
आत्महत्येसाठी जास्त वापर
आत्महत्येसाठी धावत्या रेल्वेखाली उडी मारणे हा पर्यात सर्वात जास्त वापरला जातो. यामुळे रेल्वे ट्रॅकवर सापडणाऱ्या मृतदेहांचे प्रमाण मोठे असते. आत्महत्या करणाऱ्याच्या खिशात चिठ्ठी किंवा ओळखपत्र असेल तर त्याची ओळख लगेच पटते. आजूबाजूच्या पोलीस ठाण्यात कोठे मिसिंगची तक्रार दाखल असेल तरीही अशा व्यक्तींची ओळख पटली जाते.
पूर्वी रेल्वे ट्रॅक ओलांडताना अपघाती मृत्यूचे प्रमाण मोठे होते. मात्र रेल्वे प्रशासनाने ठिकठिकाणी सिग्नण यंत्रणा यांत्रिक तसेच मानवी गेट आणि उड्डाणपूल उभारले गेल्याने हे प्रमाण नगण्य झाले आहे. तर दुसरीकडे काही घटना अशाही घडतात की एखाद्याचा खून करून त्याची ओळख पटू नये म्हणून मृतदेह रेल्वे ट्रॅकवर टाकला जातो. यामुळे ट्रॅकवर सापडलेल्या प्रत्येक मृतदेहामागील कारणांची शहानिशा करावी लागते.
वर्षे मयत जखमी ओळख न पटलेले
2019 519 340 191
2020 250 90 79
2021 206 55 60





