Dengue Cases: डासांची उत्पत्तीस्थळे, आजाराचा वाढता विळखा! तीन महिन्यांत २.९४ लाख घरांची तपासणी
Dengue Cases: २,२६१ घरांत डासांच्या अळ्या, ३६६ जणांवर दंडात्मक कारवाई

अस्मिता हिरवे
पिंपरी : पावसाळा ओसरत असतानाही पिंपरी-चिंचवड शहरातील डासांची उत्पत्तीस्थळे कायम असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारवाईतून समोर आले आहे.
जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत आरोग्य विभागाने तब्बल २ लाख ९४ हजार १८६ घरांची तपासणी केली. यामध्ये २ हजार २६१ घरांमध्ये डासांच्या अळ्या आढळून आल्या. दुसरीकडे डासांमुळे आजारांचा विळखा वाढत आहे. शहरात थंडी-तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असून डेंग्यूचे रूग्णही आढळत आहेत.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, जूनमध्ये १ लाख ५ हजार ५३५, जुलैमध्ये १ लाख ५६ हजार २९४, तर ऑगस्टमध्ये ३२ हजार ३५७ घरांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत जूनमध्ये ३०५, जुलैमध्ये तब्बल १ हजार ६९७ आणि ऑगस्टमध्ये २५९ घरांमध्ये डासांच्या अळ्या आढळल्या.
डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता असलेल्या १४ लाख ५२ हजार ७२५ कंटेनरची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २ हजार ४२८ कंटेनरमध्ये डासांच्या अळ्या आढळल्या.
डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी ३ हजार ७८४ कंटेनर रिकामे करण्यात आले, तर २ हजार ३८१ कंटेनरमध्ये औषध टाकण्यात आले. टायर, पिंप, ड्रम आदी १ हजार २७२ ठिकाणांची, तसेच १ हजार ३६८ बांधकामांची तपासणी करण्यात आली.
नोटीस, दंडाची कारवाईही सुरू
डासांची उत्पत्तीस्थळे आढळल्यानंतर महापालिकेने संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. जून ते ऑगस्टदरम्यान २ हजार २४८ नोटीस बजावण्यात आल्या. तसेच ३६६ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
या कारवाईतून महापालिकेने तब्बल ६ लाख १९ हजार रुपयांचा दंड वसूल केला. जूनमध्ये १ लाख ६७ हजार, जुलैमध्ये ३ लाख ४४ हजार, तर ऑगस्टमध्ये १ लाख ८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
डेंग्यूचा धोका वाढतोय
शहरातील डेंग्यूची स्थितीही चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. जुलैमध्ये ६५० डेंग्यू संशयित रुग्णांपैकी २३ जणांचे अहवाल सकारात्मक आले होते. ऑगस्टमध्ये ६४२ संशयित रुग्णांपैकी २५ जणांचे अहवाल सकारात्मक आले. त्यामुळे डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
याशिवाय ऑगस्टमध्ये ३० हजारांहून अधिक नागरिकांना तीव्र थंडी-तापाचा त्रास झाल्याची नोंद आहे. शहरात मलेरिया आणि चिकनगुनियाचे रुग्णही आढळल्याने पावसाळ्यानंतरचे आजार नियंत्रणात ठेवण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे.
नागरिकांनी काळजी घेण्याची गरज
डासांची उत्पत्ती प्रामुख्याने घराभोवती, गच्चीवर, कुंड्या, टाकाऊ वस्तू, टायर, डबे, पिंप तसेच इतर ठिकाणी साचलेल्या स्वच्छ पाण्यात होते. त्यामुळे केवळ महापालिकेच्या कारवाईवर अवलंबून न राहता नागरिकांनीही घर आणि परिसरात पाणी साचणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे.
पाणी साचणारी भांडी नियमित रिकामी करणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि डासांची उत्पत्तीस्थळे आढळल्यास तातडीने ती नष्ट करणे, यामुळे डेंग्यूचा प्रसार रोखण्यास मदत होऊ शकते.
गांभिर्याने घेण्याची गरज
आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणावर तपासणी, औषधोपचारात्मक प्रतिबंध आणि दंडात्मक कारवाई सुरू असली तरी २,२६१ घरांमध्ये डासांच्या अळ्या आढळणे आणि ऑगस्टमध्ये डेंग्यूचे २५ रुग्ण बाधित होणे, ही आकडेवारी नागरिकांनी आणि प्रशासनाने अधिक गांभिर्याने घेण्याची गरज अधोरेखित करते. पावसाळा संपत असताना डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करण्याची मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे.





