Moshi Murder Case : मोशीतील खून प्रकरणाचा उलगडा; ४ आरोपी जेरबंद, पण ‘हा’ मुख्य सूत्रधार अजूनही फरार
Moshi Murder Case : १३ मे रोजी झालेल्या अनिल मारुती गोळे यांच्या हत्येप्रकरणी भोसरी पोलिसांनी आवळला फास; शांतीनगर आणि लांडेवाडीतील ४ आरोपींना अटक.

Moshi Murder Case – अनिल मारुती गोळे उर्फ मोरे यांच्या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात एमआयडीसी भोसरी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, खुनाचा मुख्य सूत्रधार नितीन दिगंबर धोत्रे हा अद्यापही फरार आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
१३ मे २०२६ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास अनिल गोळे यांच्यावर धारदार चाकूने सपासप वार करण्यात आले होते. हॉटेल युवराज गार्डन परिसरात झालेल्या या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेमुळे मोशी आणि भोसरी परिसरात मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी नागनाथ कुंडलिक चाटे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे १५ मे रोजी नागेश लक्ष्मण काळे (वय २९), अजय सर्जेराव गायकवाड (वय २०), अजय सिकंदर आव्हाड (वय २७, तिघेही रा. शांतीनगर वसाहत, भोसरी) आणि दत्ता चत्रभुज शिनगारे (वय ३०, रा. आंबेडकर वसाहत, लांडेवाडी, भोसरी) या चौघांना अटक केली होती.
न्यायालयाने त्यांना २५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान, या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार नितीन दिगंबर धोत्रे हा अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत.





