Pune Crime : आंदेकर टोळीकडून एकावर गोळीबार! वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गंभीर जखमी
Pune Crime : वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी आकाश म्हस्केचा भाऊ अक्षयवर जीवघेणा हल्ला; गोळी लागल्याने खासगी रुग्णालयात उपचार सुरू.

Pune Crime – माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खून प्रकणातील आरोपीच्या भावावर पुणे- सातारा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरात पिस्तुलातून गोळ्या झाडून कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना घडली. राजर्षी शाहू बँकेसमोरील एका हाॅटेलसमोर ही घटना घडल्याने घबराट उडाली. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अक्षय ऊर्फ बाळा बापू म्हस्के (वय २६, रा. आंबेगाव पठार, धनकवडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदेकर खून प्रकरणात अक्षय म्हस्के याचा भाऊ आकाश याला उशिरा अटक करण्यात आली होती. खून प्रकरणातील आरोपींना आकाश म्हस्के याने मध्य प्रदेशातून पिस्तुले आणून दिली होती. त्यानंतर आकाशला खून प्रकरणात अटक करण्यात आली होती. आकाशचा भाऊ अक्षय हा बुधवारी (दि. २०) सकाळी नाश्ता करण्यासाठी आला होता.
त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर पिस्तुलातून गोळी झाडली. एक गोळी अक्षय याच्या पायात शिरली. हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी घटनास्थळी भेट दिली. प्राथमिक चौकशीत पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार झाल्याची माहिती मिळाली आहे.
पसार झालेल्या हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. १ सप्टेंबर २०२४ रोजी नाना पेठेतील डोके तालीम चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. वनराजचा खून वर्चस्व, तसेच संपत्तीच्या वादातून करण्यात आला होता.
या प्रकरणात सोमनाथ गायकवाड, अनिकेत दूधभाते, वनराज आंदेकरची बहीण संजीवनी कोमकर, पती जयंत कोमकर आणि दीर गणेश कोमकर यांच्यासह १६ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आंदेकर टोळीने वनराजच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष (वय २०, रा. लक्ष्मी सोसायटी, हमाल तालमीजवळ, नाना पेठ) याचा सोसायटीच्या आवारात ५ सप्टेंबर २०२५ रोजी गोळीबार करून खून केला होता.
या प्रकरणात बंडू आंदेकरसह साथीदारांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर १ नोव्हेंबर २०२५ राेजी बदला घेण्यासाठी आंदेकर खून प्रकरणातील आरोपी समीर काळे याचा भाऊ गणेश किसन काळे (वय ३२, रा. येवलेवाडी, कोढवा) याचा कोंढव्यातील खडी मशिन चौकात गोळ्या झाडून खून केला होता. त्यानंतर पुन्हा ही गोळीबाराची घटना घडली आहे.





