Loni Kalbhor Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
Loni Kalbhor Accident : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील शेल पेट्रोलपंपाजवळ भरधाव कारने रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाला चिरडले; कारचालक संतोष राठोडवर गुन्हा दाखल.

Loni Kalbhor Accident – पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लोणी काळभोर परिसरात झालेल्या भीषण अपघातात एका अनोळखी तरुणाचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेगातील कारने जोरदार धडक दिल्याने संबंधित तरुण गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
संतोष भीमराव राठोड (वय 41, रा. वाकड, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कारचालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार अतुल अमृत रायबोले (वय 40) यांनी सरकारतर्फे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 22 मे रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास डायल 112 वर एका नागरिकाने फोन करून शेल पेट्रोलपंपाजवळील बोरकरवस्ती परिसरात अपघात झाल्याची माहिती दिली.
त्यानंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अतुल रायबोले आणि ए. व्ही. पवार तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी सोलापूर-पुणे मार्गाच्या बाजूला एफ. एस. टिंबर दुकानासमोर अंदाजे 30 वर्षीय अनोळखी तरुण रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळून आला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. जवळच कार उभी होती.
पोलिसांनी कारचालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव संतोष राठोड असल्याचे सांगितले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली की, संबंधित तरुण रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगातील कारने त्याला जोरदार धडक दिली. धडकेनंतर तरुण कारवर आपटून रस्त्याच्या बाजूला फेकला गेला. यानंतर पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने जखमी तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.





