Pimpri Chinchwad Crime : उड्डाणपुलावर तरुणीसमोर अश्लील कृत्य! कपडे बदलून पळालेल्या बाउन्सरचा पोलिसांनी ‘असा’ लावला छडा
Pimpri Chinchwad Crime : संत मदर तेरेसा उड्डाणपुलावरील अश्लील कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; पीडित तरुणीच्या धाडसामुळे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात.

Pimpri Chinchwad Crime – संत मदर तेरेसा उड्डाणपुलावर तरुणीसमोर अश्लील कृत्य करून पसार झालेल्या माथेफिरूला पिंपरी पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत अटक केली. आरोपीने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी कपडे बदलले होते. मात्र त्याच्या पायातील शूज आणि टी-शर्टच्या रंगामुळे अखेर त्याचा सगळा डाव फसला. तब्बल ६० ते ७० सीसीटीव्ही फुटेज तपासत पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला.
झाकीर शेख (वय ४३, रा. चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे अटक आरोपीचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी हा एका नामांकित मॉलमध्ये बाउन्सर म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी संबंधित तरुणी संत मदर तेरेसा उड्डाणपुलावरून जात होती. त्यावेळी आरोपीने तिच्यासमोर अश्लील कृत्य केले. अचानक घडलेल्या प्रकारामुळे तरुणी घाबरली.
मात्र, तिने धाडस दाखवत तिने आरोपीचे शुटींग केले. सोशम मीडियावर व्हीडिओ व्हायरल झाल्याने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हा घडल्यानंतर आरोपीने स्वतःची ओळख लपवण्यासाठी कपडे बदलले होते. सुरुवातीला पोलिसांकडे कोणताही ठोस पुरावा नव्हता. मात्र, पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने परिसरातील ६० ते ७० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यात एका संशयिताच्या पायातील शूज आणि टी-शर्टचा रंग वारंवार दिसून आला. पोलिसांनी याच धाग्यावरून तपासाची दिशा निश्चित केली.
चिंचवडेनगरमधून आरोपीला बेड्या
पोलिसांचे पथक वाल्हेकरवाडीतील चिंचवडेनगर परिसरात पोहोचले. तेथे सापळा रचून झाकीर शेख याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसी चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. या कारवाईमुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा आपली सतर्कता दाखवून दिली आहे.





