Moshi Garbage Depot: मोशी दुर्घटनेनंतर शहरावर नवे संकट! कचरा डेपोखाली साचले तब्बल ६ लाख लिटर विषारी द्रव्य
Moshi Garbage Depot: ५ ते ६ लाख लिटर विषारी पाणी (लिचेड) शुद्ध करून सोडणे प्रशासनासमोर कठीण टास्क; कचरा वाहनांसाठी रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू.

Moshi Garbage Depot – मोशी येथील कचरा डेपोमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दुर्घटना झालेल्या अनधिकृत इमारत व कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली लाखो लिटर विषारी द्रव्य (लिचेड) असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हे द्रव्य बाहेर काढून त्याची विल्हेवाट लावणे, तसेच कचऱ्याचा ढिगारा व्यवस्थित केल्याशिवाय मोशी कचरा डेपोमध्ये कचरा टाकता येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
मोशी येथे ८ जुलैला कचरा डेपोमध्ये कचऱ्याचा डोंगर कोसळून भीषण दुर्घटना घडली. यामध्ये नऊ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तर नऊ कर्मचारी गंभीर जखमी झाले. दुर्घटनेनंतर तब्बल ८४ तास मदत व बचावकार्य सुरू होते. ही घटना घडल्यापासून मोशी कचरा डेपोमध्ये कचरा टाकणे बंद करण्यात आले आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून इतर ठिकाणी आरोग्य विभागाच्या वतीने कचरा टाकण्यात येत आहे. मात्र, कचऱ्याचा उठाव होत नसल्याने शहरात रस्ते.
उड्डाणपूल, मोकळ्या जागा याठिकाणी मोठे कचऱ्याचे ढीग लागले आहेत. त्यामुळे शहरात कचराकोंडी झाली असून तातडीने मोशी कचरा डेपोमध्ये कचरा टाकण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, दुर्घटना झालेल्या ठिकाणी कोसळलेल्या इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणावर विषारी पाणी साचले आहे. हे पाणी कचऱ्याच्या डोंगरातून आले असून कोसळलेल्या इमारतीच्या पार्किंग, तळ मजल्यापर्यंत हे विषारी द्रव्य साचले आहे.
ते किमान पाच ते सहा लाख लिटर असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली विषारी वायू असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इमारतीमध्ये साचलेले पाणी शुद्ध करून ते इतर ठिकाणी सोडणे हे प्रशासनासमोर आव्हान असणार आहे. तसेच इमारत व कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये असलेला रस्ता मोकळा करावा लागणार आहे. कोसळलेल्या कचऱ्याचा डोंगर पुन्हा कोसळणार नाही याची तजवीज करण्यासाठी यंत्राच्या सहाय्याने हा कचरा पुन्हा व्यवस्थित करावा लागणार आहे.
अन्यथा याठिकाणी असलेल्या रस्त्यावरून कचऱ्याचे वाहन जात असताना कचरा कोसळला तर पुन्हा दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने कचऱ्याचा डोंगर हटविणे, विषारी वायू नष्ट करणे व विषारी द्रव्यावर प्रक्रिया करून ते पाणी दुसरीकडे सोडण्यासाठी काम सुरू केले आहे. त्याला किमान पाच ते सहा दिवस लागणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
“दुर्घटना झालेल्या ठिकाणी पाच लाख लिटर विषारी द्रव्य आहे. त्याची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. तसेच शहरातील कचरा डेपोत टाकण्यासाठी हे काम प्राधान्याने करणे आवश्यक आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. येत्या पाच ते सहा दिवसांत शहरातील कचरा डेपोत टाकण्यास सुरूवात होईल.”
– प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता.






