Satara News: पालिकेचे लाखो रुपये पाण्यात? सोनगाव कचरा डेपोतील सौरऊर्जा प्रकल्प पडला निकामी
Satara News: सोलर पॅनेल्सभोवती वाढले गवत; लाखो रुपयांचा प्रकल्प धूळ खात पडून राहिल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी.

Satara News – शहरातील कचरा व्यवस्थापन प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीच्या उद्देशाने सोनगाव येथील कचरा डेपोमध्ये उभारण्यात आलेला सोलर प्लँट अद्यापही बंद अवस्थेत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. मोठा खर्च करुन उभारण्यात आलेली ही यंत्रणा गेल्या अनेक महिन्यांपासून कार्यान्वित नसल्याने त्याचा अपेक्षित लाभ नगरपालिका प्रशासनाला आणि नागरिकांनाही मिळत नसल्याचे चित्र आहे.
सोनगाव कचरा डेपो येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास पूरक म्हणून सौरऊर्जा निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात आला होता. या प्रकल्पातून वीजनिर्मिती करुन कचरा प्रक्रिया केंद्रातील विविध यंत्रणा चालविण्याचा तसेच वीज खर्चात बचत करण्याचा उद्देश होता. मात्र, प्रत्यक्षात हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर काही काळातच बंद पडल्याचे सांगितले जाते. त्यानंतर त्याच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीबाबत अनेकदा चर्चा झाली. परंतु, अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही.
स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार सोलर पॅनल व अन्य उपकरणांची नियमित देखभाल न झाल्याने यंत्रणेची अवस्था दिवसेंदिवस खराब होत आहे. काही ठिकाणी गवत वाढले असून पॅनल्सवर धूळ साचल्याचेही दिसून येते. त्यामुळे लाखो रुपयांची गुंतवणूक निष्प्रभ ठरत असल्याची टीका होत आहे. विशेष म्हणजे, पर्यावरण संवर्धन आणि हरित ऊर्जेला प्रोत्साहन देण्याबाबत शासनाकडून सातत्याने भर दिला जात असताना स्थानिक स्तरावर अशा प्रकल्पांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर येत आहे.
सोलर प्लँट कार्यान्वित झाल्यास पालिकेचा वीज खर्च कमी होण्याबरोबरच पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीलाही चालना मिळू शकते. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हा प्रकल्प कागदोपत्रीच राहिल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. ‘माझी वसुंधरा’ अभियानामध्ये विभागीय पातळीवर क्रमांक मिळवणाऱ्या सातारा नगरपालिकेचे या प्रकल्पाकडे होणारे दुर्लक्षाबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, संबंधित विभागाने या प्रकल्पाची तांत्रिक तपासणी करुन तो तातडीने सुरू करण्याची मागणी नागरिक व पर्यावरणप्रेमी संघटनांकडून करण्यात येत आहे. आगामी काळात पालिका प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




