Indrayani River Pollution : पवित्र इंद्रायणीचे पाणी झाले विषारी! कामशेतमध्ये सांडपाणी थेट नदीत; नागरिकांच्या जिवाशी खेळ
Indrayani River Pollution : नदीच्या पाण्यामुळे त्वचेचे विकार बळावले; दूषित पाण्यामुळे जलपर्णीचा सुळसुळाट होऊन नैसर्गिक जलप्रवाह पूर्णपणे रोखला.

Indrayani River Pollution – राज्यातील कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचे केंद्र असलेली इंद्रायणी नदी मावळ तालुक्यातून पुढे मार्गक्रमण करते. परंतु येथे नदीचे पावित्र्य जपण्याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. कामशेत परिसरातून वाहणाऱ्या पवित्र इंद्रायणी नदीत थेट गटाराचे सांडपाणी सोडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या बेकायदेशीर आणि बेफिकीर कृत्यामुळे नदीचे प्रदूषण झपाट्याने वाढत असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
एकेकाळी स्वच्छ आणि जीवनदायी मानली जाणारी इंद्रायणी नदी आज दूषित पाण्याच्या विळख्यात अडकली असल्याचे वास्तव समोर येत आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, कामशेत शहरातील काही भागांमधील ड्रेनेज लाईन थेट नदीपात्राशी जोडण्यात आल्या आहेत. या माध्यमातून कोणतीही शुद्धीकरण प्रक्रिया न करता सांडपाणी थेट नदीत सोडले जात आहे. परिणामी नदीतील पाण्याचा रंग बदलणे, फेस साचणे, दुर्गंधी पसरने आणि पाण्याची गुणवत्ता घसरत जाणे असे गंभीर परिणाम दिसून येत आहेत.
नदीतील या वाढत्या प्रदूषणाचा परिणाम केवळ पर्यावरणापुरता मर्यादित न राहता नागरिकांच्या आरोग्यावरही होत आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत ग्रामस्थ नदीत पोहण्यासाठी जात असत, नदीचे पाणी दैनंदिन वापरासाठीही उपयोगात आणले जात होते. मात्र सध्याच्या परिस्थितीत नदीत पोहल्यास त्वचेवर फोड येणे, खाज सुटणे यासारख्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी नदीकाठाकडे जाणेही टाळण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, या नदीचे पाणी पुढे पिण्यासाठी वापरले जाते.
मात्र सध्या नळाद्वारे मिळणाऱ्या पाण्यातही गाळ, कचरा आणि अशुद्ध घटक आढळून येत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबतही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या परिस्थितीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी या प्रकाराविरोधात आवाज उठवत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे, ड्रेनेज लाईनची योग्य व्यवस्था करणे आणि नदी प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.
दूषित पाणी पोहोचतेय आळंदीला
इंद्रायणी नदी ही केवळ स्थानिकांसाठीच नव्हे, तर धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. हीच नदी पुढे आळंदी येथे वाहते, जे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीस्थळामुळे पवित्र स्थान म्हणून ओळखले जाते. त्यामुळे कामशेत परिसरातून सोडले जाणारे दूषित सांडपाणी पुढे आळंदीपर्यंत पोहोचत असल्याने तेथील नागरिकांनाही धोका निर्माण होत आहे.
जलपर्णीमुळे नैसर्गिक प्रवाह अडथळीत
नदीत सोडण्यात आलेल्या सांडपाण्यामुळे दूषित झालेल्या नदीत मोठ्या प्रमाणात जलपर्णी पसरली आहे. त्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडथळित होत असून पर्यावरण आणि आरोग्याचा प्रश्न तीव्र झाला आहे. सोबतच या दूषित पाण्यामुळे नदीत पोषक द्रव्यांचे प्रमाण वाढून जलपर्णी झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी नदीच्या पृष्ठभागावर हिरव्या जलपर्णीचा जाड थर साचला असून अनेक ठिकाणी पाणी पूर्णपणे झाकले गेले आहे.
“इंद्रायणी नदीमध्ये थेट सांडपाणी सोडले जात असल्यामुळे नदीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. कोणतीही प्रक्रिया न करता हे पाणी नदीत सोडले जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून नदीत पोहल्यास अंगावर फोड येणे, खाज येणे असे प्रकार वाढले आहेत. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.”
– तुषार शिंदे, सामाजिक कार्यकर्ते






