Pune News | कोंढवा परिसरात ८० हून अधिक अनधिकृत बांधकामे

प्रभात वृत्तसेवा
पुणे – कोंढवा परिसरात २०२२ पासून सुमारे ७० ते ८० मोठी अनधिकृत बांधकामे झाली असल्याचे समोर आले आहे. या बांधकामांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाकडून कारवाई करणे, तसेच गुन्हे दाखल करण्यासाठी सुमारे ४० अभियंत्यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. त्याअंतर्गत या अभियंत्यांकडून गेल्या काही दिवसांपासून कारवाई सुरू करण्यात आली असून, अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात येत आहेत.
या मोहिमेअंतर्गत बुधवारी कोंढवा येथील मलिकनगर (सर्व्हे नं. ४६ पैकी) येथील चार मजली आरसीसी बांधकाम आणि साईबाबानगर (सर्व्हे नं. ६२ पैकी) येथील तीन मजली आरसीसी बांधकाम अशा एकूण सुमारे ३,८०० चौरस फूट क्षेत्रातील अनधिकृत बांधकामावर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या कारवाईनंतर सदर इमारती धोकादायक झाल्या असून, त्या कोणत्याही प्रकारे वापरणे, राहणे अथवा त्या ठिकाणी सदनिका विकत घेणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या बांधकामांशी संबंधित कोणतीही व्यवहार किंवा गुंतवणूक नागरिकांनी करू नये, अशीही सूचना करण्यात आली आहे.
गुन्हेही होणार दाखल
महापालिकेकडून या भागात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सुमारे ७० ते ८० अनधिकृत बांधकामे समोर आली आहेत. यातील काही बांधकामांचा वापर सुरू झाल्याने त्या ठिकाणी नागरिक राहायला आहेत. अशा इमारतींना नोटिसा बजावून त्या खाली करण्यासाठी पोलिसांची मदत घेतली जाणार आहेत, तर जी बांधकामे सुरू आहेत, ती पाडण्यात येत आहेत. या इमारती दाट वस्तीच्या भागात असल्याने प्रशासनाला अडचणी येत असल्याने त्याअंतर्गत भागात तोडल्या जात आहेत. त्यामुळे ही बांधकामे धोकादायक झाली आहेत. पोलिसांकडून पुढील एक ते दोन महिन्यांत ही अनधिकृत बांधकामे काढली जाणार असल्याचे महापालिकेच्या बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता (बांधकाम परवानगी) राजेश बनकर यांनी सांगितले.




