जुलै महिन्याच्या ‘या’ तारखेला सुरु होणार संसदेचे पावसाळी अधिवेशन ! समान नागरी कायद्यासह विरोधकांच्या एकजुटीचे काय होणार ?

नवी दिल्ली – संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार असून ते 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज ही माहिती दिली. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीविरोधात देशातील विरोधी पक्ष एकत्र यायला लागले असल्यामुळे हे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समान नागरी कायद्याबाबत चर्चेचा जोरदार आग्रह धरलेला असतानाच हे अधिवेशन होणार आहे. पावसाळी अधिवेशनाची सुरुवात संसदेच्या जुन्या इमारतीमध्येच होईल. त्यानंतर संसदेचे कामकाज संसदेच्या नवीन इमारतीमध्ये सुरू राहिल, असे बोलले जात आहे. संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते 28 मे रोजी करण्यात आले आहे.
एकूण 23 दिवस चालणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये 17 बैठका होणार असून या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय राजधानी दिल्ली (दुरुस्ती) अध्यादेशाच्या जागेवर लागू करण्यात येणारे विधायक मांडले जाण्याची शक्यता आहे.
प्रशासकीय कामकाजामध्ये दिल्ली सरकारचे अधिक नियंत्रण असल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात हा अध्यादेश लागू करण्यात आला आहे. तसेच बैठकांसाठी एकत्र येणारे विरोधक सभागृहात भाजप विरोधात एकवटणार का ? याचे देखील उत्तर यानिमित्ताने जनतेला मिळणार आहे.





