पुण्यात मान्सूनचे वेळेआधी आगमन; आठवडाभर आधीच पावसाची दमदार एन्ट्री

Monsoon Update | यंदा वेळीच्या आधी मान्सूनने आज २६ मे रोजी पुणे शहरात प्रवेश केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनची उत्तरी मर्यादा आता मुंबई, पुणे, सोलापूर येथून पुढे सरकत आहे.
नैऋत्य मान्सूनने आज मध्य अरबी समुद्राच्या काही भागांत, मुंबईसह महाराष्ट्राच्या आणखी काही भागांत, तसेच बंगळूरुसह कर्नाटकात पुढील वाटचाल केली आहे. तामिळनाडूच्या उर्वरित भागांत, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या काही भागांत, तसेच पश्चिम-मध्य व उत्तर बंगालच्या उपसागराच्या काही भागांतही मान्सूनने प्रगती केली आहे.
ईशान्येकडील राज्यांमध्ये मिझोरामचा उर्वरित भाग, संपूर्ण त्रिपुरा, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि आसाम व मेघालयच्या काही भागांतही मान्सून दाखल झाला आहे. पुणे आणि सोलापुरात मान्सून दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यानुसार पुढील काही दिवसांत महाराष्ट्रातील आणखी काही भाग मान्सून व्यापणार असल्याचे सांगितले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनची उत्तरी मर्यादा सध्या १७.०° उत्तर/५५° पूर्व, १७.५° उत्तर/६०° पूर्व, १८° उत्तर/६५° पूर्व, १८.५° उत्तर/७०° पूर्व, मुंबई, पुणे, सोलापूर, कलाबुर्गी, महबूबनगर, कावली, १६.५° उत्तर/८३° पूर्व, १९° उत्तर/८६° पूर्व, २१° उत्तर/८९° पूर्व, अगरतला, गोलपारा आणि २८.५° उत्तर/८९° पूर्व या भागांतून जात आहे. Monsoon Update |
याशिवाय पुढील तीन दिवसांत नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या उर्वरित भागासह महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तसेच पश्चिम-मध्य बंगालचा उपसागर, उत्तर बंगालचा उपसागर, ईशान्येकडील काही राज्य, हिमालयातील पश्चिम बंगाल व सिक्कीमच्या काही भागांत पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थितीत आहे.





