Monsoon Arrival: मावळात अखेर वरुणराजाची एन्ट्री! पण शेतकऱ्यांसमोर उभं राहिलंय ‘हे’ नवं मोठं संकट
Monsoon Arrival: लोणावळा, पवनानगर, अंदर मावळसह पश्चिम पट्ट्यात पावसाचा जोर; निसर्गाच्या मनोहारी कायापालटाने संपूर्ण परिसर सुखावला.

Monsoon Arrival – दीर्घ प्रतिक्षेनंतर झालेल्या पावसाच्या आगमनाने मावळ तालुका सुखावला आहे. दोन-तीन दिवसांपासून बरसत असलेल्या हलक्या आणि मध्यम सरींनी मावळचे रुपडे पालटले आहे. डोंगरांवर उतरलेली ढगांची चादर, आजूबाजूला पसरलेली हिरवळ आणि धरणातील पाणी असा मनोहारी कायापालट झाला असून एक मनाला आनंद देणारे रूप पहायला मिळत आहे.
मावळ तालुक्यात मान्सूनच्या पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावला असून खरीप भात पिकाला जीवदान मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण व मोठा दिलासा मिळाला आहे. मावळ तालुका हा प्राधान्याने खरीप भात उत्पादक तालुका असून या तालुक्यात लागवडी खालील क्षेत्रापैकी सुमारे १३ हजार पाचशे हेक्टर क्षेत्रावर भात पीक घेतले जाते तर खरीप भात पिकाशिवाय संकरीत ज्वारी, सोयाबीन,भुईमूग, चवळी,मूग,उडीद,
वाटाणा ही पिकेही घेतली जातात या पावसाने या सर्व पिकांच्या पेरण्या व्यवस्थित होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यावर्षी मान्सूनच्या पावसाने सुमारे तीन आठवडे उशीर केलेला असून शेतकरी या पावसाची चातकासारखी वाट पाहत होते. काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात खरीप भात रोपांसाठी धुळवाफेवर पेरण्या केल्या होत्या. मात्र आज मान्सूनच्या पावसाने चांगली सुरुवात केली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. पाऊस लांबल्याने भुईमूग, चवळी, मूग, उडीद, वाटाणा या पिकाच्या पेरण्या मात्र रखडल्या होत्या. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. तीन आठवडे उशीर झाल्याने यावर्षी खरीप कडधान्ये या पिकाच्या पेरणी क्षेत्र घटण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती. मात्र मान्सूनच्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मान्सूनच्या या पावसाचा जोर पश्चिम पट्ट्यामध्ये असून पश्चिम पट्ट्यातील लोणावळा,खंडाळा, पवनानगर, अंदर मावळ या भागात बऱ्यापैकी पाऊस पडत असल्याने त्या भागामध्ये टाकलेल्या भात रोपांच्या पिकांना आधार मिळालेला आहे. त्यामुळे शेतकरी आता मान्सूनपूर्व पावसाने केलेल्या मशागती व पाऊस पडल्यावर लागणाऱ्या मशागतीच्या कामात गुंतला आहे.
मावळ तालुक्यात केवळ खरीप भात पिकाचा जास्त जोर असल्याने शेतकऱ्यांनी खरीप भात बियाण्यांची तयारी करून ठेवलेली आहे मात्र त्यासाठी लागणाऱ्या रासायनिक खताचा मोठा तुटवडा असल्याने शेतकऱ्यांनी रासायनिक खतांच्या दुकानाकडे मोठी गर्दी केलेली आहे. सध्या मावळात मान्सूनचा चांगला पाऊस पडत आहे. खरीप भात पिकासाठी धूळ वाफेवर शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या त्याची उगवणही चांगली झाली आहे.
यावर्षी मावळ तालुक्यातील खरीप भात उत्पादक शेतकऱ्यांनी इंद्रायणी जातीच्या सुवासिक भाताला सर्वाधिक पसंती दिलेली असून १३ हजार पाचशे हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे ९० टक्के क्षेत्रावर खरीप इंद्रायणी जातीच्या भाताला पसंती दिलेली आहे. दरवर्षीच इंद्रायणी जातीच्या भाताला ही सर्वाधिक लागवड मावळ तालुक्यात होत असते. शेतकरी त्यासाठी शुद्ध बियाणे, प्रमाणित बियाणांची तयारी ठेवून वेळोवेळी पेरणी करत असतात.






