प्रभात वृत्तसेवा कान्हे – ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आज पुणे–मुंबई महामार्गावर कोकण भागातून आळंदीकडे जाणाऱ्या दिंडीमुळे मुंबई पुणे महामार्ग भक्तीमय झाल्याचे पहायला मिळाले मावळ तालुक्यातील मुंबई पुणे महामार्ग लगत असणाऱ्या गावांमध्ये या दिंड्यांचे सहर्ष स्वागत करत त्यांना भोजन नाश्ता अशा अनेक सुविधा मावळ तालुक्यातील ठिकठिकाणी गावांमध्ये पाहायला मिळाल्या व भक्तिरसाचे वातावरण पहायला मिळाले. आळंदीच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या वारकऱ्यांच्या दिंड्यांनी महामार्गावर विठ्ठलनामाचा गजर घुमवून टाकला.सकाळपासूनच उरण पनवेल तसेच मावळ तालुक्यातील संत तुकाराम पादुका स्थान येथून निघालेली दिंडी व प्रत्येक गावातील परिसरात वारकऱ्यांची मोठी गर्दी उसळली होती. भगव्या झेंड्यांनी सजलेल्या दिंड्या, टाळ–चिपळ्यांचा निनाद, आणि “ज्ञानोबा माऊली”, “तुकाराम”च्या जयघोषांनी संपूर्ण महामार्ग भक्तिमय झाला होता. हजारो वारकरी तुळशीमाळा, गळ्यातील भगवे वस्त्र आणि विठ्ठलनामाचा जप करत आळंदीच्या दिशेने मार्गस्थ होताना दिसले.रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी वारकऱ्यांचे जलपान, नाश्ता आणि फुलवर्षाव करून स्वागत केले. अनेक ठिकाणी सामाजिक संस्था आणि स्वयंसेवकांनी अन्नछत्रांची व्यवस्था केली होती. कामशेत नायगाव कान्हे परिसरात भक्तिभावाचे दृश्य पाहून वाहनचालकही क्षणभर थांबून माऊलींचे दर्शन घेताना दिसले. वाहतुकीवर मोठा ताण येऊ नये म्हणून कामशेत पोलीस प्रशासनाने विशेष नियोजन केले. वारकरी संप्रदायातील भक्तांनी सांगितले की, “ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा प्रवास म्हणजे फक्त चाल नाही तर हा एक भक्तीचा प्रवास आहे. विठ्ठल नामाचा जयघोष करत व ज्ञानेश्वर माऊली तुकाराम असा जयघोष करत पाऊल टाकत आळंदीकडे प्रस्थान करत असतात. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या दिंड्यांनी मावळ तालुक्यातील पुणे मुंबई महामार्ग भक्तीमय झाल्याचे दिसून आले