Indrayani River : इंद्रायणी नदी प्रदूषण नियंत्रणासाठी प्रशासनाची दखल
Indrayani River: सिद्धेश्वर व कापूर ओढ्यावर बायो-रिमेडिएशन प्रक्रिया सुरू

Indrayani River : – इंद्रायणी नदीतील वाढते प्रदूषण, नदीपात्रातील दूषित पाणी आणि अलीकडे मोठ्या प्रमाणावर आढळून आलेल्या मृत माशांच्या घटनांबाबत दैनिक प्रभातने सातत्याने वृत्त प्रसिद्ध केले होते.
या वृत्तांची दखल घेत देहू नगरपंचायत प्रशासनाने नदी प्रदूषण नियंत्रणासाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना सुरू केल्या आहेत. इंद्रायणी नदीचे पर्यावरणीय संतुलन अबाधित राखणे आणि पाण्याची गुणवत्ता सुधारण्याच्या उद्देशाने सिद्धेश्वर ओढा आणि कापूर ओढा येथे बायो-रिमेडिएशन प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
इंद्रायणी नदीत विविध नाल्यांमधून सांडपाणी आणि सेंद्रिय कचरा मिसळत असल्याने पाण्याची गुणवत्ता खालावत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यानंतर नगरपंचायतीने प्रदूषणाच्या मूळ स्रोतांवर नियंत्रण मिळविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सिद्धेश्वर आणि कापूर ओढ्यांवर बायो-रिमेडिएशन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला आहे.
Pune District : पाभे, भोमाळे, भोरगिरी येथील ढापे काढले
या प्रक्रियेत विशेष जैविक घटकांच्या साहाय्याने सांडपाण्यातील सेंद्रिय प्रदूषकांचे विघटन केले जाते, त्यामुळे नदीत मिसळणाऱ्या दूषित पाण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.
नगरपंचायत प्रशासनाच्या माहितीनुसार, या प्रक्रियेमुळे नदीपात्रातील पाण्याची गुणवत्ता सुधारण्यास, पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास, दुर्गंधी कमी होण्यास तसेच जलचरांच्या संवर्धनास मदत होणार आहे. परिणामी इंद्रायणी नदीचे पर्यावरणीय संतुलन टिकवून ठेवण्यासाठी या उपक्रमाचे महत्त्वपूर्ण योगदान ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, नदी स्वच्छता अभियानालाही गती देण्यात आली असून नदीपात्रातील कचरा आणि मृत मासे तातडीने हटविण्याची मोहीम नियमितपणे राबविली जात आहे. तसेच नदी प्रदूषणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.
पाण्याच्या गुणवत्तेचे नियमित परीक्षण करण्यात येत असून संबंधित शासकीय विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि अन्य यंत्रणांशी समन्वय साधून पुढील उपाययोजना सुरू असल्याचे नगरपंचायत प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन
देहू नगरपंचायतीने नागरिकांनाही नदी संवर्धनाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. नदीपात्रात कचरा, निर्माल्य, प्लास्टिक किंवा इतर टाकाऊ पदार्थ टाकू नयेत तसेच स्वच्छता मोहिमांमध्ये सहभागी होऊन इंद्रायणी नदी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
इंद्रायणी नदी ही केवळ जलस्रोत नसून वारकरी संप्रदायाची श्रद्धास्थान आणि देहूच्या सांस्कृतिक व धार्मिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे नदीचे संवर्धन आणि प्रदूषणमुक्ती ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले आहे.





