मुंबई, पुण्यासह दिल्लीत मान्सून सक्रिय; हवामान विभागाची अधिकृत घोषणा

मुंबई : मागच्या एक महिन्यापासून प्रतीक्षा करायला लावणाऱ्या पावसाने आता सगळीकडे दमदार एंट्री केलीआहे. त्यातच आता मुंबई आणि दिल्लीत मान्सून सक्रिय झाल्याची अधिकृत घोषणा भारतीय हवामान विभागाकडून करण्यात आली आहे. मुंबईत 11 जून रोजी मान्सून दाखल होण्याची तारीख आहे. तर दिल्लीत 27 जून रोजी मान्सून दाखल होत असतो. मात्र, यावर्षी मुंबईत 14 दिवस उशिराने मान्सून दाखल झाला आहे तर दिल्लीत दोन दिवस आधीच मान्सूनचे आगमन झाले आहे.
तब्बल 62 वर्षांनंतर मुंबई आणि दिल्लीत एकाच दिवशी मान्सून दाखल झाला आहे. यापूर्वी मान्सून मुंबई आणि दिल्लीत 21 जून 1961 रोजी दाखल झाला होता. त्यानंतर आज मुंबई आणि दिल्लीत मान्सून सक्रिय झाल्याची घोषणा हवामान विभागाने केली आहे. मुंबईत मान्सून दाखल होण्याची संभाव्य तारीख 11 जून तर दिल्लीत दाखल होण्याची संभाव्य तारीख 27 जून आहे.
दोन दिवसांपूर्वीच मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईच्या विविध भागात चांगला पाऊस कोसळत आहे. त्यामुळं हवामान विभाग मुंबईत मान्सून दाखल झाल्याची घोषणा कधी करणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर आज हवामान विभागानं मुंबईसह दिल्लीत मान्सून दाखल झाल्याची घोषणा केली आहे. दरम्यान, यावर्षी तब्बल 14 दिवस उशीरानं मुंबईत मान्सून दाखल झाला आहे. तर दिल्लीत दोन दिवस आधीच मान्सूनचे आगमन झालं आहे. दरम्यान, पावसाला सुरुवात झाल्यामुळं मुंबईकरांनी उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
सध्या दिल्लीसह उत्तर भारतात जोरदार पाऊस पडत आहे. तसेच मुंबईतही चांगला पाऊस पडत आहे. हा पाऊस मान्सूनपूर्व असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली होती. मात्र, काही वेळापूर्वीच मान्सून दाखल झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. दरवर्षी परिस्थिती मान्सून लवकर दाखल होतो. यावेळी मात्र, मान्सून दाखल होण्यास वेळ लागला आहे.
यंदा मान्सूनवर बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम झाला असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली आहे. दरम्यान, उत्तर भारतातील काही राज्यात पावसानं चांगली हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. मान्सूनसाठी सध्या वातावरण अनुकूल असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.





