Molestation Case: आंबेगावात ४ वर्षीय बालिकेच्या विनयभंगानंतर संतापाचा उद्रेक; शिंगवे गावात भव्य जनआक्रोश मोर्चा
Molestation Case: भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि ह.भ.प. संग्राम बापू भंडारे यांच्या नेतृत्वाखाली शिंगवे येथे जनआक्रोश; विविध हिंदुत्ववादी संघटनांचा सहभाग.

Molestation Case – आंबेगाव तालुक्यातील पारगाव कारखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिंगवे गावात चार वर्षीय बालिकेच्या विनयभंगाच्या घटनेच्या निषेधार्थ रविवार, दि. १२ रोजी संपूर्ण गाव बंद ठेवण्यात आले. ग्रामस्थ व विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने सायंकाळी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चामध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, ह.भ.प.संग्राम बापू भंडारे यांच्यासह विविध मान्यवर सहभागी झाले होते.
प्रकरणातील आरोपी परप्रांतीय सलून कामगार मोहम्मद फरदीन फरीद शाह (वय २०) याच्याविरुद्ध कठोर कारवाई करून त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली. मोर्चाची सुरुवात शिंगवे गावातून करण्यात आली. यावेळी भाजप जिल्हा उद्योग आघाडीचे अध्यक्ष प्रमोद बाणखेले ,जिल्हा सचिव संदीप बाणखेले, गणेश बाणखेले, अॅड. स्वप्न खामकर यांच्यासह महिला, युवक तसेच विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

पारगाव शिंगवे (ता. आंबेगाव) : बालिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी निषेध म्हणून जन आक्रोश मोर्चा शिंगवे येथे काढण्यात आला.
गावातील प्रमुख मार्गांवरून मोर्चा काढल्यानंतर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत आमदार गोपीचंद पडळकर व ह.भ.प. संग्राम बापू भंडारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, राज्यात महिलांवरील अत्याचार, विनयभंग व बलात्काराच्या घटना वाढत असून त्याबाबत समाजामध्ये तीव्र संताप आहे. चार वर्षीय बालिकेच्या विनयभंगाच्या प्रकरणातील आरोपीवर जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच अल्पवयीन मुलींवरील अत्याचार करणाऱ्या आरोपींवर तातडीने कायदेशीर कारवाई करून त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी व्यक्त केली. ह.भ.प. संग्राम बापू भंडारे यांनी आपल्या भाषणात येथील घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत समाजाने मुलींच्या सुरक्षेबाबत अधिक जागरूक राहण्याचे आवाहन केले. तसेच कायद्याच्या चौकटीत राहून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कमलेश तुळे यांनी केले. नितीन वाव्हळ यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन रुपेश तागड यांनी केले.दरम्यान, घटनेच्या निषेधार्थ शिंगवे गावात दिवसभर बंद पाळण्यात आला.गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.जनआक्रोश मोर्चादरम्यान परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.





