Smart Meter Protest: स्मार्ट मीटरविरोधात इंदापुरात ‘जनआक्रोश’! कडकडीत बंद पाळत दाखवली लोकशक्तीची ताकद
Smart Meter Protest: इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व आंदोलन; महावितरणच्या अधिकार्यांना निवेदन देत मागण्यांचे जाहीर वाचन.

Smart Meter Protest – स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या इंदापूर बंदला शनिवारी शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. व्यापारी, व्यावसायिक, शेतकरी, कामगार, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत शहरातील बहुतांश व्यवहार बंद ठेवत स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधातील तीव्र जनभावना व्यक्त केली.
इंदापूर नगरपालिकेसमोर झालेल्या सभेला हजारो नागरिक उपस्थित होते. आंदोलनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. त्यानंतर महावितरणच्या अधिकार्यांना निवेदन देऊन स्मार्ट मीटरची सक्ती तातडीने रद्द करावी, ग्राहकांच्या पूर्वसंमतीशिवाय कोणत्याही घरावर स्मार्ट मीटर बसवू नयेत तसेच जनहिताविरोधी निर्णय मागे घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली.
सभेदरम्यान लोकसभेत केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर यांनी स्मार्ट मीटर यापुढे सक्तीचे नसून ऐच्छिक स्वरूपात राहतील, असे वक्तव्य केल्याची माहिती आंदोलनस्थळी पोहोचताच उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात आनंद व्यक्त केला. या घडामोडीमुळे आंदोलनाच्या भूमिकेला बळ मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी भाजप नेते प्रदीप गारटकर म्हणाले, सरकार हे जनतेसाठी असते, जनतेवर निर्णय लादण्यासाठी नव्हे.
लोकहिताला बाधा आणणारी कोणतीही योजना जनतेच्या इच्छेविरुद्ध राबविली जाऊ शकत नाही. इंदापूरकरांनी आज लोकशक्तीची ताकद दाखवून दिली आहे. जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू केलेला संघर्ष शेवटपर्यंत सुरू राहील. इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीचे प्रमुख प्रा. कृष्णाजी ताटे यांनी स्मार्ट मीटर योजनेवर टीका करताना सांगितले, ग्राहकांची पूर्वसंमती न घेता कोणत्याही घरावर स्मार्ट मीटर बसविणे योग्य नाही.
वीज ही नागरिकांची मूलभूत गरज असून, सामान्य ग्राहकांच्या हिताचे संरक्षण झाले पाहिजे. संघर्ष समिती कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी नव्हे, तर नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी लढत आहे.सभेत हमीद अत्तार, महादेव चव्हाण, कैलास कदम, गोरख शिंदे, मेजर महादेव सोमवंशी, विजयाताई कोकाटे यांनीही मनोगत व्यक्त करून स्मार्ट मीटरची सक्ती मागे घेण्याची मागणी केली. यावेळी पैलवान पांडुरंग शिंदे, स्वप्नील पवार, शकील मोमीन, हर्षवर्धन कांबळे, चंद्रकांत धनवे यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते.



