Shirur Crime – कवठे येमाई (ता. शिरूर) परिसरात ३ एप्रिल रोजी घडलेल्या एका घटनेने आता वेगळेच वळण घेतले आहे. या एकाच घटनेतून मारहाण आणि विनयभंगाच्या परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्याने तपास यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. किरकोळ वादातून सुरू झालेल्या या संघर्षाचे रूपांतर गंभीर गुन्ह्यांमध्ये झाले असून, दोन्ही बाजूंनी शिरूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रारी नोंदवल्या आहेत. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तक्रारदार शरीफ उस्मान पिंजारी (वय ३३) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ३ एप्रिल रोजी दुपारी एकच्या सुमारास सुदाम इचके, शुभम इचके, भाऊ इचके, कैलास बच्चे आणि केतन माटे हे पाच जण त्यांच्या घरात जबरदस्तीने घुसले. पाणी मागण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून या आरोपींनी लोखंडी पाइप, काठ्या आणि बेल्टने शरीफ यांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात शरीफ यांचा डावा पाय फ्रॅक्चर झाला असून, त्यांच्यावर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे, याच घटनेतील संबंधित गटातील एका विवाहित महिलेने शरीफ पिंजारी याच्यावर गंभीर आरोप करत विनयभंगाची तक्रार दिली आहे. या महिलेच्या म्हणण्यानुसार, मारहाणीच्या घटनेपूर्वी शरीफ हा दारूच्या नशेत तिच्या घरात घुसला होता. त्याने तिचा हात पकडून धमकी दिली, ओढणी ओढली आणि अश्लील वर्तन केले. महिलेने आरडाओरडा केल्यानंतर तिचे नातेवाईक तिथे जमा झाले आणि त्यानंतरच दोन्ही गटांत वादावादी होऊन मारहाण झाल्याचे समोर येत आहे. या परस्परविरोधी दाव्यांमुळे प्रकरणाची गुंतागुंत वाढली आहे. शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक या दोन्ही तक्रारींचा सखोल तपास करत आहे. वैद्यकीय अहवाल, साक्षीदारांचे जबाब आणि घटनास्थळावरील पुराव्यांच्या आधारे नेमका घटनाक्रम स्पष्ट करण्याचे काम सुरू आहे. भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये दोन्ही बाजूंच्या तक्रारींची नोंद करण्यात आली असून, पोलीस सत्य शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.