पिंपरी | मोहननगर जलतरण तलावाचे होणार नूतनीकरण

पिंपरी, (प्रतिनिधी)- पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मोहननगर येथील बंद असलेला जलतरण तलावााच्या नूतनीकरणाचे का महापालिका प्रशासनाने हाती घेतले आहे.
अत्याधुनिक पद्धतीने होणार्या या जलतरण तलावाकरिता महापालिका साडे तीन कोटी रूपये खर्च करणार आहे. जलतरण तलावाच्या नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
प्रभाग क्र. 14 मधील मोहननगर येथे श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज जलतरण तलाव आहे. मात्र, हा जलतरण तलाव गेल्या चार वर्षांपासून बंद आहे.
या जलतरण तलावावर मोहननगर, काळभोरनगर, चिंचवड स्टेशन, रामनगर, लालटोपीनगर, दत्तनगर, विद्यानगर, शंकरनगर यासह आदी भागातील नागरिक, मुले पोहण्यासाठी येत होते. मात्र, हा तलाव करोनाच्या अगोदरपासून खोली कमी करण्याच्या नावाखाली बंद होता.
या तलावाचे काम करण्यासाठी स्थानिक नागरिक व राजकीय पदाधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर कामास सुरुवात झाली असून जलतरण तलावाचे पूर्णतः नूतनीकरण करण्यात येणार आहे. हा तलाव चार ते साडेचार फूट खोलीचा असणार आहे. तलाव बंदिस्तही करण्यात येणार आहे. यामध्ये बेबी पूलही असणार आहे. कामाची मुदत डिसेंबर 2025 पर्यंत आहे.
मिळत होते सर्वाधिक उत्पन्न
मोहननगर जलतरण तलावावर पोहण्यासाठी येणार्यांची सातत्याने गर्दी असायची. मात्र, गेल्या चार वर्षांपासून हा जलतरण तलाव बंद असल्याने खेळाडू, शालेय मुले, इतर नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
या जलतरण तलावातून महापालिकेला सर्वाधिक उत्पन्न मिळत होते. आता या जलतरण तलावाचे अत्याधुनिक पद्धतीने काम करण्यात येणार आहे. या तलावावर महिला, मुलीही पोहण्यासाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा बंदिस्त तलाव करण्यात येणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून मोहननगर येथील श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज जलतरण तलावाचे अत्याधुनिक पद्धतीने नूतनीकरण करावे, यासाठी प्रयत्न केले. या प्रयत्नांना यश आले असून जलतरण तलावाच्या स्थापत्य विषयक सुधारणा करण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिली होती.
मात्र, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या तलावाच्या कामाची वर्क ऑर्डर राहिली होती. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच या कामासाठी पुन्हा पाठपुरावा केला. त्यामुळेच जलतरण तलावाचे काम सुरू करण्याचे क्रीडा स्थापत्य विभागाने आदेश दिले आहेत. – विशाल काळभोर, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष





