Pimpri : निगडीतील जलतरण तलावही ठेकेदाराच्या हाती

पिंपरी : महापालिकेच्या वतीने निगडी येथे छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव उभारण्यात आला आहे. हा तलाव कोविडमध्ये बंद करण्यात आला होता. तलाव सुरू करण्यासाठी स्थानिक नागरिक व खेळाडूंनी मागणी केली होती. त्यानुसार हा तरण तलाव सुरू करण्यात आला आहे. मात्र, तो महापालिका नव्हे तर ठेकेदार चालवणार आहे. त्यासाठी तीन वर्षांचा करार करण्यात आला असून त्याला महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव निगडी, आकुर्डी, प्राधिकरण, रावेत आणि बिजलीनगर येथील रहिवाशांसाठी महत्वाचा आहे. कोविड-१९ साथीच्या आजारामुळे २०२० मध्ये सुरुवातीला हा तलाव बंद करण्यात आला. स्वीमिंग पूल बंद असल्याने स्थानिकांनी आंदोलन केले होते. अखेर हा पूल सुरू करण्यासाठी महापालिकेच्या क्रीडा विभागाने ७ फेब्रुवारीला निविदा काढली.
त्यामध्ये १४ लाख ४० हजार रुपये दर सादर करण्यात आला होता. यामध्ये ३ निविदाधारकांनी सहभाग घेतला. त्यापैकी मे वाटरवर्ल्ड इंडिया सेफ्टी गियर्स यांनी २२ टक्के जास्त १७ लाख ५६ हजार ८०० रुपये इतका दर सादर केला.
त्यांनी भाटेपोटी दिलेला दर तुलनात्मक दृष्ट्या अधिक असल्याने त्यांची निविदा स्वीकृत करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांना तीन वर्ष जलतरण तलाव चालवण्याचे काम देण्यात आले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांसाठी निगडीतील जलतरण तलाव खुला झाला आहे.





